मुंबई, दि. 21 : मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक प्रतिभा लाभलेलं अमूल्य रत्न म्हणजे, कवयित्री शांता शेळके ! त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या “हे शब्द रेशमाचे” या सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन येत्या 23 जुलै रोजी करण्यात आले आहे.
ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री शांता शेळके यांच्या दीर्घ लेखन-कारकीर्दीत मराठी साहित्यनिर्मिती व साहित्यविचार ह्यांत अनेक स्थित्यंतरे झाली. अनुवादक, समीक्षा-स्तंभ लेखिका, वृत्तपत्र सहसंपादक म्हणून शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुलभ, प्रासादिक रचना हे त्यांच्या काव्य लेखनाचे एक महत्त्वाची वैशिष्ट्य होते. संतांचे अभंग, ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. शांता शेळके यांच्या विपुल व बहुआयामी साहित्यनिर्मितीचा मागोवा घेत त्यांच्या अलौकिक कार्याची नोंद रहावी याकरिता “हे शब्द रेशमाचे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि. 23 जुलै 2022 रोजी रात्री. 8.30 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, मुंबई उपनगर येथे करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची संकल्पना सादरीकरण विनीत गोरे यांचे केले असून, या स्वरसोहळ्यात सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडके, प्राजक्ता रानडे, सावनी रवींद्र, जय आजगांवकर, अर्चना गोरे, नचिकेत देसाई, बालकलाकार काव्या खेडेकर व शराण्या साखरदांडे हे गाणी सादर करणार आहेत. प्रशांत लळित हे संगीत संयोजन करणार असून वैशाली पोतदार यांचे कथक नृत्य होणार आहे. अभिनेत्री समिरा गुजर-जोशी या निवेदन करणार आहेत. कविता व उतारा अभिवाचन प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री व प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर करणार आहेत. कविता, गाणी, किस्से व वाद्यवृंदांच्या सहाय्याने कार्यक्रमाची प्रस्तुती केली जाईल. हा कार्यक्रम विनामूल्य असून काही जागा या, निमंत्रितांसाठी राखीव आहेत.