संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कढोली गावात दोन दिवसीय ‘शासन आपल्या दारी’शिबिर संपन्न
कामठी :- सर्व सामान्य गोरगरीब,शेतकरी ,शेतमजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासकीय स्तरावरून विविध उपक्रम राबविले जातात.या माध्यमातून शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’या अभियानातून लोकाभिमुख योजनेचा लाभ देण्यात येत आहे तेव्हा शासनाच्या लोकाभिमुख योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन कढोली ग्रामपंचायत चे सरपंच लक्ष्मण करारे यांनी कढोली येथे आयोजित दोन दिवसीय ‘शासन आपल्या दारी ‘ शिबिराच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी नायब तहसीलदार अमर हांडा,विस्तार अधिकारी गोपीचंद कातुरे ,सचिव ब्रह्मानंद खडसे, ग्रा प उपसरपंच महेश कुपाले,समस्त ग्रा प सदस्यगण, लिहिगाव ग्रा प सरपंच अस्मिता खांडेकर,महालगाव ग्रा प सरपंच प्रकाश गजभिये, गारला ग्रा प सरपंच शहाणे, उपसरपंच राहुल बोढारे,गुमथळा सरपंच प्रणाली डाफ, भोवरी सरपंच ऋषी भेंडे,तसेच समस्त गावकरी वर्ग व प्रशासनिक अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.
या दोन दिवसीय शिबिरात कामठी तहसील कार्यालय अंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना,इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना,राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ,सेतू विभागाची विविध प्रमाणपत्र ,सलोखा योजना,शिधापत्रिका, पंतप्रधान किसान सन्मान योजना,मतदार नोंदणी,7/12 व खाते उतारा ,इत्यादी योजनेचा लाभ देण्यात आला.
‘ शासन आपल्या दारी ‘हे दोन दिवसीय शिबीर यशस्वी पार पाडण्यासाठी तहसील कार्यालय ,पंचायत समिती ,सहकार विभाग,कृषी विभाग,आरोग्य विभाग ,महिला व बाल विकास विभाग तसेच पोलीस प्रशासन व कढोली ग्रा प प्रशासनाने मोलाचे परिश्रम घेतले.