मुंबई :- ‘लेट्स चेंज’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्वाचा विकासदेखील आवश्यक असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो साध्य होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘प्रोजेक्ट लेट्स चेंज’ याअंतर्गत विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता मॉनिटर’ ही जबाबदारी स्वीकारून इतरांना प्रोत्साहित करण्याचा उपक्रम दिनांक 02 ऑक्टोबर ते 24 डिसेंबर 2022 या कालावधीत राबविण्यात आला होता. या उपक्रमात सर्वोत्तम कामगिरी करणारे पाच जिल्हे, पाच समन्वयक तसेच 30 शाळा आणि विद्यार्थ्यांचा आज मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यावेळी मंत्री दीपक केसरकर बोलत होते. प्रधान सचिव रणजित सिंह देओल, सहसचिव इम्तियाज काझी, लेटस् चेंज प्रकल्प संचालक रोहीत आर्या आदी यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेची आवश्यकता लक्षात येऊन त्याची सवय लागावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांनाच ‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून जबाबदारी घेण्यास प्रोत्साहित करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता मॉनिटर’ ही जबाबदारी स्वीकारून उत्कृष्ट कार्य केले आहे. या उपक्रमास शिक्षक व मुख्याध्यापक यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून राज्यातील 12 हजार 678 शाळांनी तसेच सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुलांमध्ये आगळी शक्ती असते. त्यांनी प्रेमाने सांगितलेले पालकांसह समाजही ऐकतो. कचरा टाकणे ही वाईट प्रवृत्ती असून त्याबाबत जागृती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे ती निर्माण केली आहे. हा उपक्रम राज्याला आणि देशालाही दिशा देणारा आहे. विद्यार्थ्यांनी यात पुढाकार घेऊन प्रवृत्तीमध्ये बदल घडविण्याचा चमत्कार केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण आणि श्रमाला महत्त्व यावर भर देण्यात आला आहे. यामुळे विविध क्षेत्रांत कुशल नागरिक घडतील आणि त्यांना जगभर मागणी असेल, असे ते म्हणाले. यावर्षीपासून विद्यार्थ्यांना गणवेश, बुट, मौजे, वह्या शासनामार्फत दिल्या जाणार असल्याचा उल्लेख करून विद्यार्थ्यांना कोडिंगचे प्रशिक्षणही दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘स्वच्छता मॉनिटर’ म्हणून उत्कृष्ट काम केलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच त्यांना मार्गदर्शन केलेल्या शिक्षक, मुख्याध्यापक यांनी यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. हा उपक्रम राबविताना आलेले अनुभव सांगून यापुढेही स्वच्छतेसाठी आयुष्यभर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शाळांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्री नृसिंह विद्यालय, चास; औरंगाबाद जिल्ह्यातील फातेमा गर्ल्स उर्दू हायस्कूल, नागसेन कॉलनी; बुलढाणा जिल्ह्यातील नगर परिषद श्री शिवाजी हायस्कूल देऊळगाव राजा, एनव्ही चिन्मय विद्यालय शेगाव, कोठारी गर्ल्स हायस्कूल नांदुरा, देऊळगाव राजा हायस्कूल, युगधर्म पब्लिक स्कूल, खामगाव; गडचिरोली जिल्ह्यातील राणी दुर्गावती विद्यालय आलापल्ली; जालना जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी हायस्कूल अंकुशनगर, जनता हायस्कूल, मत्स्योदरी विद्यालय, नेत्रदीप विद्यालय मोतीगव्हाण, शांतीनिकेतन विद्यामंदिर, झेडपीपीएस भिलपुरी (केएच); कोल्हापूर जिल्ह्यातील उषाराजे हायस्कूल, मुंबई नॉर्थ जिल्ह्यातील कार्तिका हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सीईएस मायकेल हायस्कूल, पीव्हीजी विद्याभवन हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, चेंबूर कर्नाटक हायस्कूल, स्वामी विवेकानंद विद्यालय कुर्ला; नागपूर जिल्ह्यातील एसएफएस हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज; नाशिक जिल्ह्यातील रचना माध्यमिक विद्यालय, मराठा हायस्कूल; पुणे जिल्ह्यातील पीईएस मॉडर्न गर्ल्स हायस्कूल शिवाजीनगर, महात्मा गांधी विद्यालय मंचर, सीबीटी साधना कन्या विद्यालय; रायगड जिल्ह्यातील श्रीमती भागुबाई चांगु ठाकूर विद्यालय; सातारा जिल्ह्यातील सरस्वती विद्यालय कोरेगाव; सोलापूर जिल्ह्यातील केएलई अन्नाप्पा काडादी हायस्कूल, मनपा गर्ल्स मराठी शाळा क्र. 16, श्री सिद्धेश्वर बालमंदिर आणि झेडपीपीएम स्कूल होटगी या शाळांचा समावेश आहे.
या शाळांसह बुलढाणा, जालना, मुंबई, पुणे, सोलापूर या जिल्ह्यातील समन्वयक, शिक्षणाधिकारी यांचा यानिमित्ताने सत्कार करण्यात आला.