नागपूर :-स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी (ता.१८) ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात १ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच ४ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत इतवारी, टिळक चौक येथील जैन प्लास्टिक या दुकानाविरुध्द कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत मनीष नगर टी पॉईंट येथील बालाजी फूड अँड नास्ता पॉईंट यांच्याविरुध्द सिवेज लाईन नसल्याप्रकरणी व स्वयंपाकगृह अस्वच्छ आढळल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोन अंतर्गत नारा, शामभाऊ नगर येथील आर. के. एस. पब्लिक स्कूल यांच्याविरुध्द विद्युत खांबांवर विनापरवानगी जाहिरात बॅनर लावल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.