नागपूर : नागपूर महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता अजय देवराव पोहेकर आपल्या सेवेतून सोमवारी (ता. ३१ जानेवारी) सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या छोटेखानी कार्यक्रमात आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी पोहेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपयुक्त निर्भय जैन, मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता अविनाश बारहाते, अजय मानकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अजय पोहेकर यांनी ३६ वर्षे शासनाला सेवा दिली. मागील वर्षीच ते मनपाच्या सेवेत रुजू झाले होते. त्यांनी रत्नागिरी, मुंबई, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, भंडारा अशा विविध ठिकाणी त्यांनी सेवा दिली आहे. त्यांची निवड १९८६ साली महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-१ मध्ये झाली होती. चंद्रपूर येथे कार्यरत असताना त्यांनी वणोजा येथील पैनगंगा नदीवर ६५० मीटर लांबीचा पूल केवळ एका वर्षात बांधला होता. तसेच अंभोरा येथे सुद्धा ७०५ मीटर लांबीचा पूल बांधला.
अभियंता अजय पोहेकर यांच्या नेतृत्वात जाम-वरोरा-चंद्रपूर-बामणी रस्त्याचे चौपदरीकरण पी पी पी तत्वावर करण्याचा पहिला प्रयोग झाला होता. नागपूर शहरात वंजारी नगर पुलाचे बांधकाम, कामठी-कळमना रोडवर मोठ्या आर.ओ.बी. चे त्यांनी नियोजन केले आहे. बी.एस.यू.पी. मधील सर्व दहाही योजना त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत.