ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल अणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या 900 खाटांच्या नुतन इमारत बांधकामाच्या भुमिपूजन सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी केंद्रिय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार निरंजन डावखरे, रमेश पाटील, संजय केळकर, रविंद्र फाटक, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार, सा.बां. प्रा. विभाग कोकणचे मुख्य अभियंता शरद राजभोज, ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भुमिपूजन व रीमोटव्दारे कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ऐतिहासिक दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, धर्मवीर आनंद दिघे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे एक वेगळे नाते जोडले गेले होते. दिघे साहेबांच्या काळात जिल्हा रुग्णालयात विविध ठिकाणांहून आलेल्या रुग्णाबद्दल दिघे यांना माहिती मिळताच, आलेल्या प्रत्येक रुग्णाची दिघे स्वत: प्रत्यक्ष येऊन विचारपूस करत असत. त्यांना काही अडचणी असल्या तर ते त्याचवेळी त्या अडचणींचे निरासन करत. त्यामुळे या रुग्णालयाचे नुतनीकरण करणे, अत्याधुनिक करण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले आहे. कोराना काळात या रुग्णालयाने महत्वाची भुमिका बजावली आहे. या रुग्णालयामुळे कोरोना महामारीत लाखो लोकांचे जीव वाचले आहेत.

सर्व अडचणींवर मात करुन अत्याधुनिक सेवासुविधा असलेले रुग्णालय ठाणेकरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे. या नवीन इमारतीच्या बांधकामाचे काम पाहणाऱ्या मे. हर्ष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी विहित मुदतीच्या आत दर्जेदार इमारत तयार करुन देण्याच्या सुचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे असे सांगून सर्व यंत्रणांचे अभिनंदन केले. रुग्णालयाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती इमारत जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करुन दिल्यानंतर जनतेने रुग्णालयाची काळजी घेणे आवश्यक आहे. ९०० खाटांच्या अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या रुग्णालयाचे लोकार्पण होण्याआधीच रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्यास रुग्णालय संपूर्ण ताकदीने सुरु होईल. त्यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक बाबी आतापासूनच पूर्ण कराव्या, अशा सुचना पाटील यांनी यावेळी दिल्या.

सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले की, 18 महिन्यात पूर्ण होणाऱ्या रुग्णालयाच्या बांधकामाचे मी स्वत: माझ्या स्तरावर मॉनिटरिंग करणार आहे. या बांधकामाचा प्रत्येक महिन्याचा आढावा मी घेणार आहे. हे रुग्णालय भारतात प्रथम क्रमांकचे रुग्णालय होईल. मुख्यमंत्री आणि  उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यात आरोग्याच्या विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरु नये, काळजी घ्यावी आणि सर्दी खोकल्या सारख्या आजारांचा लगेच उपचार करावा, अशा सुचनाही डॉ. तानाजी सावंत यांनी यावेळी दिल्या.

सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना यांनी प्रास्ताविक भाषण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातील चित्रफीतीव्दारे नवीन इमारतीची माहिती देण्यात आली.

यावेळी कडक उन्हात राहून वाहतुक व्यवस्था सांभळणाऱ्या पोलीसांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रीचे वाटप करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी आभार मानले.

अशी असेल नवीन इमारत; या असतील सुविधा

नवीन बांधकामाचे एकूण क्षेत्रफळ 6 लाख 81 हजार 397.40 स्वे.फुट आहे. मुख्य इमारत (Block-A) यामध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालय बेसमेंट 2 + बेसमेंट 1 + तळ मजला + 10 मजले एअर रुग्णवाहिकांचा समावेश आहे. यात एक परिचारीका प्रशिक्षण केंद्र इमारत आहे. ही इमारत 10 मजली असून यामध्ये बैठक कक्ष, 300 प्रशिक्षणार्थीसाठी प्रशिक्षण वर्ग, तळमजल्यावर भोजनकक्ष इ. सुविधाउपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर वसतीगृहाची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मुख्य इमारतीच्या मागील बाजूस वाहनतळ, तळ मजला + 6 मजले क्षमतेचा असून इमारतीच्या छतावर सौरउर्जातंत्र बसविण्यात येणार आहे. रुग्णालयाची नवीन इमारत (Block-A) व नर्सिंग प्रशिक्षण केंद्र ( Block-B) या दोन्ही इमारतींना सातव्या मजल्यावर पूलाव्दारे जोडण्यात आले आहे. इमारतीमध्ये 14 उद्वाहन, 11 आधुनिक आय.सी.यु. (एकूण 117 खाटा), 15 ओ.टी., इ. सर्व अद्ययावत सोई-सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णालयात सौर उर्जेद्वारे निर्माण केलेल्या वीजेचा वापर करण्यात येणार आहे. 200 खाटांच्या सुपरस्पेशालीटी विभागामध्ये कार्डीओलॉजी, न्युरोलॉजी, ऑनकॉलॉजी आणि नेफ्रॉलॉजी या प्रमाणे अत्याधुनिक साधनसामुग्रीसह सुविधा उपलब्ध होणार आहेत. 500 खाटांच्या जिल्हा रुग्णालयामध्ये गेरियाटीक वॉर्ड, मेडिकल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड, इएनटीसह, ऑर्थोपेडीक वॉर्ड, ट्रामा केअर युनिट, इन्टेन्सिव्ह केअर युनिट, आयसोलेशन वॉर्ड, बर्न वॉर्ड, आय वॉर्ड व शस्त्रक्रियागृह, टीबी आणि चेस्ट वॉर्ड, एसएनसीयु वॉर्ड, एनआरसी वॉर्ड, सायकॅट्रिक वॉर्ड, प्रिंझनर वॉर्ड, हिमॅटॉलॉजी वॉर्ड याप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

200 खाटांच्या महिला व बाल रुग्णालयामध्ये प्रसुतीपूर्व/प्रसुतीपश्चात/प्रसुती कक्ष तसेच इक्लॅम्पशिया कक्ष, तसेच प्रसुती वॉर्ड व बालरुग्ण वॉर्ड सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज अशा रुग्णालयात ब्रेन, हार्ट, किडनी सर्जरी, अत्याधुनिक डायलिसीस, कार्डियाक न्युक्लिअर मेडिसीन, रेडिओथेरपी, केमोथेरपी, अत्याधुनिक प्रयोगशाळा इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. गंभीर आजाराच्या रुग्णांना मुंबई येथे उपचारासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही. मातामृत्यु दर कमी करण्यासाठी आधुनिक आय.सी.यु. व नवजात बालकांसाठी आधुनिक एन.आय.सी.यु. उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर अद्ययावत एमआरआय, सी.टी. स्कॅन, एक्स-रे, लॅब सुविधा उपलब्ध होणार आहेत. रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी ऑक्सिजन पीएसए प्लांट, लिक्वीड ऑक्सीजन प्लांट, जंबो ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन सेंट्रल लाईन इ. सुविधा उपलब्ध होणार आहेत व त्याचा वापर भविष्यात करण्यात येईल. ठाणे जिल्हा रुग्णालय हे ठाणे जिल्हयातील एकमेव मोठे शासकीय रुग्णालय असून लगतचे पालघर व रायगड जिल्हयातील रुग्ण येथे उपचारार्थ येत असतात. याठिकाणी सुपरस्पेशालीटी रुग्णालय झाल्यास ठाणे, पालघर, रायगड येथील गोर, गरीब, गरजू, आदिवासी रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये मुंबई येथे स्थलांतरीत करावे लागणार नाही.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra Governor inaugurates Defence Exhibition in Mumbai

Sat Apr 22 , 2023
Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated a 2- day ‘Defence Mumbai :-Exhibition’ at Kora Kendra Ground – 2 at Borivali in Mumbai on Sat (22 April). The Governor witnessed the Exhibition and presented laptops to the daughters of Martyrs from the Armed Forces on the occasion. The Exhibition has been organized by the ‘Atharva Foundation’ in association with the Armed Forces, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com