लोकसहभागातून ‘स्टॉप डायरिया’ अभियान यशस्वीपणे राबवा – अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांचे आवाहन

– 31 ऑगस्टपर्यंत अभियान, विविध उपक्रम राबविणार

नागपूर :- पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे आजार होतात. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणारे ‘स्टॉप डायरिया’ अभियान लोकसहभागातून मनपास्तरावर यशस्वीपणे राबवावे असे आवाहन मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने १ जुलै ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ‘स्टॉप डायरिया’ अभियान राबविण्यात येत आहे. यासंदर्भात मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता:१६) बैठक घेण्यात आली.

मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त सभाकक्षात झालेल्या बैठकीत मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजुषा मठपती, शहर क्षयरोग अधिकारी, डॉ. शिल्पा जिचकार, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतीक खान, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ सूलभा शेंडे, डॉ. वर्षा देवस्थळे, श्रीमती दीपाली नागरे यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी अभियानाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर पोहोचविणे हे या अभियानाचे अंतिम ध्येय आहे, “अतिसारावर करा मात, स्वच्छता आणि ओआरएसची घेऊनी साथ” हे या अभियानाचे घोषवाक्य आहे. या अभियानामध्ये मनपाहद्दीतील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र, सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे.

पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया, गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात. त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी झोननिहाय आणि नागरी प्राथमिक आरोग्य स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. एकूण आठ आठवडे हे अभियान चालणार असून, प्रत्येक आठवड्यात वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत. अभियान यशस्वी करण्यासाठी झोनस्तरावरवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यशाळा घेण्यात येणार आहेत.

या कार्यशाळेमध्ये घरीच ओआरएसची निर्मिती कशी करावी यासंदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार असून, शुद्ध पाण्याचे महत्त्व सांगितले जाणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणीबाबत गाव पातळीवर पोस्टर, बॅनर्स लावण्यात येणार आहेत. शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे, खाजगी रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत 3 हजार 627 लाभार्थी

Wed Jul 17 , 2024
नागपूर :- सौर ऊर्जा निर्मितीचा वापर करून तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळवून देण्यासाठीच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत नागपूर परिमंडलातील तब्बल 3 हजार 627 ग्राहकांनी घरावर सौर रुफ़ टॉप बसवून वीज निर्मिती सुरु करण्यासोबतच मोफ़त वीज मिळविणे सुरु केले आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 3 हजार 33 ग्राहकांसोबत वर्धा जिल्ह्यातील 594 ग्राहकांचा समावेश आहे. ग्राहकांना सौर रु टॉप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com