सावनेर :- मेरी माटी मेरा देश या देशपातळीवरील अभियानाचा भाग म्हणून लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशन सावनेर यांचे संयुक्त विद्यमाने कान -नाक -घसा व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन पोलीस स्टेशन सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी भूषविले तर डॉ. शिवम पुण्यानी प्रमुख वक्ते, प्रा. विलास डोईफोडे अध्यक्ष लायन्स क्लब विशेष करून उपस्थित होते.
या प्रसंगी डॉ. पुण्यानी यांनी “पावसाळ्यात होणारे आजार आणि काळजी” यावर सविस्तर विवेचन केले आणि आरोग्याशी संबंधित कुठल्याली लक्षणाकडे दुर्लक्ष न करण्याचे निवेदन केले. मेरी माटी मेरा देश या अभियानाची उपयुक्तता आणि क्लब च्या भविष्यातील निशुल्क आरोग्य तपासण्या याबद्दल प्रा. डोईफोडे यांनी उपयुक्त माहिती दिली. शासकीय कर्तव्य बजावत असतांना सर्व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा न करता स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेण्याचे यावेळी मानकर साहेबांनी प्रतिपादन केले.
याप्रसंगी डॉ. परेश झोपे आणि रुकेश मुसळे यांनी जवळपास शंभर उपस्थित्यांच्या तपासन्या करून योग्य सल्ला दिला. चार्टर प्रेसिडेंट वत्सल बांगरे, स. पो. नी. शरद भस्मे, स. पो. नी. शिवाजी नागवे सुद्धा प्रमुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार मंगला मोकाशे, स. पो. नी. यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितेश ठक्कर कोषाध्यक्ष, लायन्स क्लब, सुनीलजी तलमले, मनोजकुमार पटेल आणि शशांक देशमुख यांचे विशेष सहकार्य लाभले. अनेक पोलीस कर्मचारी आणि तालुक्यातील पोलीस पाटील यांनी शिबिराचा विशेष लाभ घेतला.