भंडारा -आधुनिक पध्दतीने भाजीपाला लागवड
भंडारा :- मोहाडी तालुक्यातील ढिवरवाडा गावातील श्रीकृष्ण वातूजी वनवे हे प्रगतशील शेतकरी आपल्या अनुकरणशील व प्रगतिशील विचारांमुळे ओळखले जातात. त्यांची एकूण कार्यशैली ही अनुकरणीय असून पंचक्रोशीतील विविध शेतकऱ्यांवर आपल्या एकूण कार्याची छाप ते पाडतात. वणवे यांची एकूण जमीन धारणा 1.24 हे एवढी असून 1.20 हे एवढ्या क्षेत्रावर आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड करून परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. वनवे यांचे संपूर्ण कुटुंब हे शेतीवर अवलंबून आहे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना शेती करण्याची आवड आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य आई, पत्नी, मुलगा व मुलगी त्यांच्या शेतीच्या कामात त्यांना मदत करून आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करतात. नैसर्गिक संकटांमुळे शेती करणे जिकरीचे ठरत असताना देखील वनवे यांनी प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड केलेली आहे.
वनवे पारंपारिक पद्धतीने शेती करत होते त्यामुळे शेतीला जास्त खर्च व कष्ट करावे लागत असे. खरीप हंगामात भात, तुर व रब्बी हंगामात हरभरा व गहू या मुख्य पिकांची लागवड ते करीत असत. त्यात भात पिकाचे क्षेत्र सर्वात जास्त असायचे. अशातच भात पिकासाठी जास्तीत जास्त रासायनिक खत व महागडे कीटकनाशकाचा वापर करीत असल्यामुळे इतरांपेक्षा त्यांना उत्पादन जरी अधिक मिळत असले तरी खर्च देखील जास्त लागायच. तसेच खत औषधी विषयी अधिक माहिती नसल्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सांगितल्याप्रमाणे महागडी खते, औषधे असे अनेक प्रयोग केल्यामुळे शेतीतील खर्च वाढत गेला व उत्पन्नामध्ये घट होत गेली. तसेच, जमिनीचे आरोग्य कमी होत गेले. यामुळे फारच कमी उत्पन्न होऊन आर्थिक समस्या दिवसेंदिवस वाढू लागल्या व शेती करणे कठीण होत होते.
सन 2019 च्या माहे मे महिन्यात कृषी विभागाअंतर्गत आयोजित केलेल्या शेतकरी चर्चा सत्रामध्ये त्यांना कृषी विभागातील विविध योजनांची माहिती मिळाली व कृषी विभागातील योजनांचा वापर करून आपल्या आर्थिक प्रगतीला हातभार लावावा असा त्यांनी विचार केला. तसेच आत्मा अंतर्गत आयोजित आंतरराज्य शेतकरी सहलीचे माध्यमातून व्हि.एन.आर सीड कंपनी, रायपुर येथे आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड प्रक्षेत्राची पाहणी केली. त्यामुळे अश्या पद्धतीने भाजीपाला लागवड करण्याचे ठरविले. कृषी विभागाशी संपर्क करून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या योजनेतील प्लास्टिक मल्चिंग तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या योजनेतील ठिबक सिंचनाचा वापर करून आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. सुरुवातीला वनवे यांनी प्लास्टिक मल्चिंग व ठिबक सिंचन वर वांगी पिकाची लागवड केली त्यानंतर हळूहळू प्लास्टिक मल्चिंग व ठिबक सिंचनाचे क्षेत्र वाढवून त्यांनी प्लास्टिक मल्चिंग व ठिबक सिंचन या निविष्ठावर मिरची, कोहळा तसेच चवळी आणि दोडका या पिकांची लागवड केली.
वनवे यांनी आपल्या शेतात खरीप हंगामामध्ये वांगी व कोहळा व रब्बी हंगामामध्ये कोहळा या भाजीपाला पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली. संपूर्ण शेतातील सेंद्रिय तसेच रासायनिक निविष्ठांचा एकत्रित वापर तसेच कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शेती करू लागले. पिकास लागणाऱ्या सेंद्रीय निविष्ठा या घरी तयार करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादन खर्चाची त्यांनी बचत केली. तसेच रासायनिक खत व सेंद्रिय खत यांचा एकात्मिक पध्दतीने वापर करून भाजीपाला पिकाचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली व यामुळे उत्पादन खर्चात बचत झाली.
भाजीपाला पिकाबरोबरच त्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला तसेच भाजीपाला पिकाचा उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने तसेच भाजीपाला पिकातील किड रोग नियंत्रणासाठी त्यांनी दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृत, निंबोळी अर्क, यासारख्या जैविक निविष्ठांचा वापर वाढविला. त्यातून खत व औषध यावरील खर्चात बचत झाली व उत्तम प्रतीचा शेतमाल विक्रीकरिता उपलब्ध होण्यास सुरुवात झाली. सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केल्यामुळे खर्चात बचत होऊन चांगला आर्थिक नफा मिळण्यास सुरुवात झाली. पिकाचे सेंद्रिय पद्धतीने लागवड करीत असल्यामुळे उत्तम प्रतीचे उत्पादन मिळाले व बाजार भाव टिकवून ठेवण्यात यश मिळाले आणि यातून आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. सन 2021-22 मध्ये त्यांना सर्व 1.20 हेक्टर क्षेत्रावर खरीप, रबी व उन्हाळी हंगामात भाजीपाला पिकाचा विचार करता त्यांना रु.३,७५,०००/- उत्पादन खर्च आला. तसेच सर्व खर्च वजा करता रु. ६,९०,०००/- निव्वळ नफा मिळाला. पुढेही अश्या प्रकारचा शाश्वत नफा त्यांना अपेक्षित आहे. शेतीला पूरक उद्योग म्हणून दुग्धव्यवसाय मधून सुद्धा चांगले आर्थिक उत्पन्न मिळत आहे.
वनवे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना दाखवून दिले कि आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड फायदेशीर आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व प्लास्टिक मल्चिंगवर भाजीपाला लागवडीस सुरुवात केली. तसेच उपलब्ध सिंचन सुविधांचा पुरेपूर वापर करून त्यांनी खरीप व रब्बी हंगाम या दोन्ही हंगामात भाजीपाला पिके घेतली. वरील सर्व पिके ही रासायनिक तसेच सेंद्रिय निविष्ठांचा एकात्मिक पध्दतीने अवलंब करून उत्पादित केली असल्या कारणाने शेतमालाची गुणवत्ता सुधारली व शेतमालास चांगली मागणी व दर सुद्धा मिळाला. कृषी विभागातर्फे आयोजित मेळावे, प्रशिक्षणास हजर राहून तसेच इतर प्रगतिशील शेतकऱ्यांकडून शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करून शेतीमधून जास्तीत जास्त आर्थिक नफा मिळविण्यावर त्यांचा भर असतो व इतर शेतकऱ्यांनीसुद्धा आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड करून नवीन तंत्रज्ञानाच स्वीकार करावा व उत्पादन वाढ करून शाश्वत उत्पन्न मिळवावे अशी वनवे अपेक्षा करतात.