संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 27:- कामठीच्या विकासाच्या ११ मागण्या मान्य करण्याचे प्रशासनाने लिखित आश्वासन दिल्यानंतर मागील १५ दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषणावर बसलेल्या कामठी नगर विकास कृती समितीच्या आंदोलन कर्त्यांनी आपले आंदोलन तात्पुर्ते थांबवले आहे. आंदोलन कर्त्यांच्या ‘टॉवर’ आंदोलनानंतर प्रशासन खळबळून जागे झाले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार व नगर परिषदेचे मुख्य अधिकारी व आंदोलकांच्या रितसर बैठकीमध्ये मागण्या मान्य करण्यात आल्या. प्रथमतःच कोणत्याही राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेप न राहता अत्यावश्यक मागण्या सामान्य नागरिकांनी मान्य करून घेतल्याची चर्चा शहरात आहे. यामध्ये तालुक्यात ५०० खाटांच्या शासकीय रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून जय स्तंभ चौकाचे सौंदर्यीकरण, भूमिगत गटार योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांविरोधात कारवाई, औद्योगिक वसाहितीची पुनर्रचना, क्रिडा संकुलाचे बांधकाम, नवीन बाजारपेठ व महिलांकरीता सार्वजनिक ठिकाणी शौचालय व बालोद्यान निर्मीतीचे आश्वासन देण्यात आले.
बैठकीनंतर कामठीचे मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी स्वतः आंदोनस्थळी भेट देऊन मान्य मागण्यांचे पत्र आंदोलकांना दिले व आंदोलन थांबवण्याची विनंती केली. तर, एका आठवड्याच्या आत मागण्यांच्या पुर्ततेचे सपशेल वेळापत्रक द्यावे, अशी मागणी यावेळी उपस्थित आंदोलकांनी केली. अन्यथा पुनःश्च तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आला. यावेळी कामठी कृती समितीचे आंदोलक सुगत रामटेके, संघदीप बेलेकर, उमेश भोकरे, गणेश आगाशे, जितू गेडाम, संघपाल गौरखेडे, मनोज घोटे, आरजू कांबळे, राजन बागडे, राहुल ढोरे, रोहित बेलेकर, सचिन वासनिक उपस्थित होते.