– जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन चा पुढाकार
यवतमाळ :- बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची जिल्ह्यात जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईनच्या मदतीने चांगली अंमलबजावणी करण्यात येत आहे. गेल्या केवळ दोन महिन्यात या कक्षाच्यावतीने तब्बल 15 बालविवाह थांबविण्यात आले आहे.
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ नुसार मुलीचे विवाहाचे वय १८ वर्ष पूर्ण व मुलाचे विवाहाचे वय २१ वर्ष पूर्ण असणे बंधनकारक आहे. अल्पवयात विवाह होण्यामुळे विविध दुष्परिणाम होतात याबाबत जनजागृती केली जाते. असे असतांना जिल्ह्यात बालिकांचे अल्पवयात विवाह केल्या जात असल्याची माहिती प्रशासनास मिळत असते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन १०९८ द्वारे जिल्ह्यातील विविध ठिकाणी नियोजित असलेले बालविवाह थांबविण्यात यश आले आहे. मागील दोन महिन्यात एकूण १५ बालविवाह थांबविण्यात आले असून प्रशासनाद्वारे बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.
नियोजित बालविवाह असलेल्या ठिकाणी यंत्रणेद्वारा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व संबंधित यंत्रानेद्वारा समुपदेशनात्मक मार्गाचा अवलंब करून मुलीच्या पालकांची भेट घेऊन मुलीचे लग्न १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगून तसेच बालविवाहाचे शारीरिक, मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असेल तर असा विवाह करणे हा बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये दखलपात्र गुन्हा आहे, याबाबत माहिती देण्यात आली.
मुलीच्या पालकांनी मुलीचे वय 18 पूर्ण झाल्यावर मुलीचे लग्न करण्याबाबत लेखी जवाब पदाधिकाऱ्याना दिला व मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत लग्न न करण्याचे ठरविले, तसेच थांबविण्यात आलेल्या सर्व बालिकांना बाल कल्याण समिती पुढे हजर करण्यात आले आहे. सदर कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजुरकर, चाईल्ड हेल्प लाईन जिल्हा समन्वयक फाल्गुन पालकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
बाल विवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी अविनाश पिसुर्डे, संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, विधी अधिकारी महेश हळदे, लेखापाल स्वप्नील शेटे सामाजिक कार्यकर्ता आकाश बुरेवार, क्षेत्रीय कार्यकर्ता कोमल नंदपटेल, चाईल्ड हेल्पलाईन १०९८ चे समुपदेशक दिव्या दानतक, सुपरवायझर गणेश आत्राम, पूनम कनाके, मनीष शेळके, केस वर्कर अश्विनी नासरे, पूजा शेलारे, शुभम कोंडलवार तसेच पोलिस विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग, गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक, सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, इतर प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्याद्वारे बालविवाह थांबविण्यात आले आहे.
बालविवाहाची माहिती द्या – डॅा.पंकज आशिया
जिल्हा प्रशासन, महिला व बाल विकास विभाग बाल विवाह प्रतिबंधासाठी सतर्क असून होणाऱ्या बाल विवाह बद्दल माहिती असल्यास अशा बालविवाहाची माहिती चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले आहे.