नागपूर :-भारतीय लेखा आणि लेखापरीक्षा विभागा अंतर्गत नागपुरच्या सिव्हील लाईन्स स्थित लेखापरिक्षण -2 कार्यालयात येत्या 14 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबर या कालावधीत लेखापरिक्षण (ऑडिट) सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या ऑडिट सप्ताह अंतर्गत ऑडिट अहवाल प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा, कार्यशाळा, मॅरेथॉन, ऑडिट जागृती कार्यक्रम, स्वच्छता अभियान, निवृती वेतन कार्यशाळा, लेखापरीक्षा प्रश्नमंजुषा यासारखे विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती क्षेत्रीय भारतीय लेखा आणि लेखापरीक्षा विभागाच्या प्रादेशिक प्रशिक्षण संस्थेच्या महासंचालिका लता मल्लिकार्जुन यांनी दिली . याप्रसंगी महालेखाकार (लेखा परिक्षण-2) प्रविण कुमार, तिरुपती वेकेंटस्वामी , उप महालेखापरीक्षक (प्रशासन ) पल्लवी होळकर, उप महालेखापरीक्षक नरेश कुमार मन्ने, प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतात 16 नोव्हेंबर हा दिवस ऑडिट दिवस म्हणून साजरा केला जातो . या ऑडिट सप्ताहाची सुरुवात नागपुरच्या लेखापरिक्षण -2 कार्यालयात 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता ऑडिट अहवाल प्रदर्शनाच्या उद्घाटनाने होईल आणि हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल या प्रदर्शनात पोस्टर्स, दृकश्राव्य आणि विविध अहवालांचे प्रदर्शन अभ्यागतांसाठी असणार आहे . 14 ते 30 नोव्हेंबर दरम्यान जनता, राज्य शासनाचे अधिकारी आणि भारतीय लेखा व लेखापरीक्षा विभागाच्या कुटुंबातील सदस्य यांच्या सहभागासाठी विशिष्ट कार्यक्रमांचे आयोजन देखील या लेखापरिक्षण सप्ताहादरम्यान करण्यात येणार आहे.
19 नोव्हेंबर रोजी नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना भारतीय लेखा आणि लेखापरीक्षा विभाग आणि भारतीय लेखा व लेखापरीक्षा विभागामध्ये सामील होण्याच्या मार्गांबद्दल जागरूक करण्यासाठी ऑडिट जागरूकता कार्यक्रमही आयोजित केला जाईल. 21 ते 22 नोव्हेंबर दरम्यान राज्य सरकारच्या आहरण आणि संवितरण अधिकार्यांसाठी निवृती वेतन शाखेद्वारे निवृती वेतन प्रकरणांवर कार्यशाळा आयोजित केली जाईल. या सप्ताहाचा समारोप 30 नोव्हेंबर दुपारी 3 वाजता होणार आहे.