भुयारी मार्गांमुळे वाहतुकीचा खोळंबा संपेल – केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी

– तांडापेठ येथे दोन भुयारी मार्गांचे भूमिपूजन

नागपूर :- बांगलादेश वस्तीत येताना नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आता दोन भुयारी मार्गांमुळे नागरिकांची सोय होणार आहे. रेल्वेचे फाटक बंद असल्यामुळे लोकांना थांबावे लागायचे. आता त्यातून मुक्ती मिळून रेल्वेमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा संपणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शनिवार) व्यक्त केला.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने सेतुबंधन योजनेंतर्गत मध्य नागपुरातील तांडापेठ येथे दोन भुयारी मार्गांचे भूमिपूजन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक जयस्वाल, श्रीकांत आगलावे, रामभाऊ आंबुलकर, विलास त्रिवेदी, सुधीर राऊत, गिरीश देशमुख, पौनीकर, किशोर पालांदूरकर, अब्दूल कदीर, राजू धकाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. गडकरी म्हणाले, ‘आता पूर्व, उत्तर व मध्य नागपूर बदलते आहे. एके काळी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होती. आता ७० टक्के नागपुरात चोवीस तास पाणी येत आहे. बांगलादेश परिसरही येत्या काळात बदललेला दिसेल. नाईक तलावाचे सौंदर्यीकरण करून तिथे म्युझिकल फाऊंटेन लावण्याचा प्रयत्न आहे. कळमना मार्गावरही रेल्वे अंडरपास होणार आहे. याशिवाय नाईक तलाव ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत आणखी एका अंडरपासला मंजुरी मिळाली आहे. रेल्वेमुळे कुणाचीही अडचण होणार नाही याची काळजी घेतली जाईल.’

कमाल टॉकीज परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट उभारले जाणार आहे. त्यामुळे या भागातील वर्दळ कमी होईल, असेही ना. गडकरी म्हणाले. ‘माझ्या आईच्या नावाने कमाल चौकात डायग्नोसीस सेंटर साकारणार आहे. त्याठिकाणी एमआरआय, सिटी स्कॅनसारख्या सर्व सुविधा अत्यल्प दरात मिळतील. या माध्यमातून समाजातील सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांची सेवा करण्याचा माझा संकल्प आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून माझे कार्य सुरू आहे,’ अशी भावना ना. गडकरी यांनी व्यक्त केली.

*असे असतील भुयारी मार्ग*

– *एक भुयारी* मार्ग नागपूर ते इतवारी रेल्वे स्थानकादरम्यान (पिली मारबत) असून त्याची रुंदी ७ मीटर व उंची २.५ मीटर आहे. पहिला भुयारी मार्ग दही बाजार, नाईक तलाव, तांडा पेठ, पिली मारबत, जागनाथ बुधवारी, मस्कासाथ या परिसरातून जाईल.

– *दुसरा भुयारी* मार्ग नागपूर ते कळमना रेल्वे स्थानकादरम्यान तांडापेठ परिसरात आहे. या भुयारी मार्गाची रुंदी ९ मीटर आणि उंची ३ मीटर आहे. दोन्ही प्रकल्पांची किंमत प्रत्येकी २० कोटी रुपये आहे. दुसरा भुयारी मार्ग तांडा पेठ, मिलिंद नगर, बाळाभाऊ पेठ, वैशाली नगर या परिसरातून जाईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रलंबित भरती प्रक्रियेसाठी कुलगुरूंचा बळी !

Mon Feb 26 , 2024
– विद्यापीठ वर्तुळात चर्चेला उधाण नागपुर :- राज्यपालांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचे निलंबन केल्यानंतर उलटसुलट चर्चेचे पेव फुटले आहे. संघ परिवारातील व्यक्तीवर कारवाई झालीच कशी? त्यामागील काय गणिते असू शकतात, यावर मतमतांतरे व्यक्त होत असून विद्यापीठातील रखडलेली प्राध्यापक भरती प्रक्रिया मार्गी लावण्यासाठीच कुलगुरूंचा बळी दिला तर नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com