– निवडणूक साक्षरता मंडळाच्या स्वाक्षरी प्रमाणपत्राचा शुभारंभ
नागपूर :- निवडणूक साक्षरता मंडळ राज्यात पुणेसह 12 जिल्ह्यात स्थापन करण्यात आले असून लोकशाही मुल्याचे शिक्षण देणारे व्यासपीठ आहे. युवकांमध्ये मतदानाबाबत असणारी उदासीनता दुर करुन मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्यास यामुळे मदत होते. कोणत्याही नव्या चळवळीत युवकांची महत्वाची भूमिका असते. आगामी लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने मतदान नोंदणीच्या कामात गती देत जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात निवडणूक साक्षरता मंडळ, अर्थ फाऊंडेशन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वाक्षरी प्रमाणपत्राचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण, राज्य समन्वयक अलताफ पिरजादे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रविण महिरे, संदीप मोरे, तहसीलदार वैशाली पाटील यावेळी उपस्थित होते. स्वाक्षरी प्रमाणपत्राचा शुभारंभ दीप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मिशन युवा एन राबविल्यामुळे जिल्ह्यातील 2 लाख विद्यार्थ्यांपैकी दीड लाख नवमतदार नोंदणी झाली आहे. अजून उर्वरित 50 हजार विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी व्हायची असून महाविद्यालयीन प्राचार्य, मुख्याध्यापक यांनी जोमाने कामास लागावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. महाविद्यालयात लिटरसी क्लब सुरु करा. विद्यार्थ्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रचार्यांनी सहकार्य करावे.आपले सहकार्य आवश्यक असून प्रतिसाद महत्वाचा आहे, असेही ते म्हणाले.
निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना झाली असून स्वाक्षरी प्रमाणपत्राच्या कार्यक्रमात एकूण 40 महाविद्यालयाचे प्राचार्य सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र देण्यात आले. प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्य, नोडल अधिकारी, कॅम्पस ॲम्बॅसिडर यांनी स्वाक्षरी व शिक्का लावून या निवडणूक साक्षरता स्वाक्षरी प्रमाणपत्राची नोंदणी केली. यावेळी प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच महाविद्यालयीन मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक विभागाने मतदारजागृती विषयी स्टॉल परिसरात लावले होते.