महिला सक्षमीकरण जनजागृती रॅली उत्साहात
नागपूर :- समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वप्रथम त्याची सुरुवात ही स्वत:पासून करणे गरजेचे असते. स्वत:त बदल घडवला तरच कोणताही बदल इतरांमध्ये रुजविला जात असतो. विद्यार्थ्यांनी कुठलेही भेदभाव न पाळता समाजसुधारणेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी आज येथे केले.
राजा राममोहन रॉय यांच्या 250 व्या जयंतीनिमित्त शासकीय विभागीय ग्रंथालय, कोलकाता येथील राजा राममोहन रॉय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सरस्वती विद्यालयात महिला सक्षमीकरण शालेय मुलांच्या जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा प्रारंभ डॉ. खोडे-चवरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. विभागीय शासकीय ग्रंथालयाच्या सहाय्यक संचालक मीनाक्षी कांबळे, वरिष्ठ कोषागार अधिकारी गीता नायर, सरस्वती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री शास्त्री, सेवासदन शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक निरंजन कुंभलकर, धरमपेठ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती अवधूत, उपमुख्याध्यापिका पुष्पा यांच्यासह शिक्षकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते.
थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी समाजातील सतीप्रथा, बालविवाह, जातीभेद यासारख्या कुप्रथांचे समुळ उच्चाटन केले. त्यांनी महिलांचा सन्मान व शिक्षणाला प्राधान्य देत त्यांच्या सक्षमीकरणासाठी अनेक कार्य केले. त्यामुळेच आज महिला सर्व क्षेत्रात सन्मानाने वावरत असून अग्रेसरही आहे, असे डॉ. खोडे-चवरे म्हणाल्या.
विद्यार्थ्यांनी थोर पुरुषांचे आचारविचार आत्मसात करुन चांगल्या गोष्टी व सवयींचे अनुकरण करावे. बालपणी केलेला अभ्यास व अध्यापित केलेले विषयांचे ज्ञान आयुष्यभर स्मरणात राहत असते. विद्यार्थ्यांनी स्वत:चे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी चांगला अभ्यास करावा. अभ्यास करताना वाचणे, समजणे, विश्लेषण करणे व लिहून पाहणे या चार पातळ्यांचा अवलंब करावा. विषयाचे वाचन करताना महत्त्वाच्या शब्दांना अधोरेखित करणे, आकृती तयार करणे, प्रश्नांची निर्मिती यावर लक्ष केंद्रीत करावे. विद्यार्थी ज्या क्षेत्रात भविष्य घडवाल, त्या क्षेत्राच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकात कांबळे यांनी महिला सक्षमीकरण रॅलीच्या आयोजनाचा हेतू सांगितला. नायर, शास्त्री व कुंभलकर आदींनी राजा राममोहन रॉय यांचे महिला सक्षमीकरणासाठी कार्य, जीवनचरित्र, महिला सक्षमीकरणाचा अर्थ व महत्व, सुदृढ समाजनिर्मितीमध्ये महिलांचे योगदान या विषयांवर मार्गदर्शन केले.
प्रारंभी राजा राममोहन रॉय यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
जिल्हा ई-ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाळे यांनी सूत्रसंचालन केले. सरस्वती विद्यालय प्रांगण- एल.ए.डी. चौक-अभ्यंकरनगर चौक- बजाजनगर चौक-सरस्वती विद्यालय शंकरनगर याप्रमाणे रॅलीचे मार्गक्रमण झाले