– सुजोक चिकित्सेची घेतली माहिती
अमरावती – विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागामधील निसर्गोपचार व योगशास्त्र विभागाच्या विद्याथ्र्यांनी नुकतीच अमरावती शहरातील राजापेठ परिसरातील श्रीहरी सुजोक व निसर्गोपचार केंद्राला भेट दिली. यावेळी केंद्राचे संचालक डॉ. आशीष राठी यांनी विद्याथ्र्यांना सुजोक चिकित्सेबद्दल सविस्तर माहिती दिली व स्माईल मेडिटेशन, कलर थेरपी, सीड्स थेरपी, ट्रायऑक्सीन, मोक्सा, मॅग्नेट्स, मुद्रा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच मधुमेह, कर्करोग, वात, सांधेदुखी, मुळव्याध अशा अनेक आजारांवर या चिकित्सेचा सकारात्मक प्रभाव कसा पडतो याविषयी सांगून सुजोक चिकित्सा कोणत्याही आजारावर करता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले.
आजघडीला औषधोपचाराच्या वाढत्या दुष्परिणामामुळे सर्वांचा कल पर्यायी चिकित्सा पद्धतीकडे वळला आहे. अशातच सुजोक ही उत्तम चिकित्सा पद्धती आहे. ही कोरियन चिकित्सा पद्धती असून त्यामध्ये हात व पायाच्या तळव्यांवर चिकित्सा केली जाते. या चिकित्सा पद्धतीचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत व त्वरीत आराम देणारी ही चिकित्सा पध्दत आहे. या चिकित्सा पध्दतीमध्ये अॅक्युप्रेशर प्रमाणेच शरीराच्या बिंदुवर दाब देवुन चिकित्सा केली जाते. ही चिकित्सा पध्दत अर्थार्जन आणि निरोगी आरोग्याचाही उत्तम मार्ग आहे. डॉ. अश्विनी राऊत यांनी डॉ. आशिष राठी व डॉ. विशाखा राठी यांचा परिचय करुन दिला. समन्वयक प्रा. आदित्य पुंड यांनी आभार मानले. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात हा सदिच्छा भेटीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा. राधिका खडके, प्रा.राहुल दोडके, प्रा. संदीप महल्ले तसेच विद्यार्थी मोठयासंख्येने उपस्थित होते.