महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
● ७ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी
नागपूर :- शालेय तसेच इयत्ता बारावीपर्यंतच्या कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोने तिकिट दरात ३० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तिकिटसाठी रोख किंवा महाकार्डचा वापर करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे स्वस्त दरात मेट्रोतून शाळा, महाविद्यालयापर्यंतच नव्हे तर इतर भागातही प्रवास करता येणार आहे.
महा मेट्रोने नेहमीच प्रवाश्यांच्या हिताचे निर्णय घेतले. शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तिकिट दरात ३० टक्के सवलत देण्याचे प्रस्तावित होते. मेट्रो स्टेशनवरील तिकिट खिडकीवर महाविद्यालय किंवा शाळेचे ओळखपत्र दाखवून ३० टक्के सवलतीच्या दरात तिकिट खरेदी करू शकतील. महाकार्डचा वापर करणाऱ्यांच्या सवलतीची रक्कम त्यांच्या कार्डमध्येच जमा केली जाईल. त्यांना पुढच्या टप्प्यातील महाकार्डमध्ये ही रक्कम राहणार आहे. यासाठी महाकार्डची सेवा देणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने सॉफ्टवेअरमध्ये नव्या सवलतीनुसार सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत महाकार्डचा वापर करणाऱ्यांना दहा टक्के सवलत दिली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी यात ३० टक्के सवलतीनुसार सुधारणा करण्यात येणार आहे.
मेट्रोतून प्रवासासाठी असलेल्या प्रत्येक किमीच्या टप्प्यासाठी ही सवलत राहणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलतीची नागरिकांची मागणी होती. या मागणीवरून महामेट्रोने विद्यार्थ्यांना तिकिट दरात सवलत उपलब्ध करून दिली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना फोटो असलेले ओळखपत्र तयार करून द्यावे, असे आवाहन महामेट्रोने केले आहे. महामेट्रोच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मेट्रोतून प्रवासासाठी महिन्याला येणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. नागपूर मेट्रोतून विद्यार्थ्यांसह नागरिकांना नेहमीच सुरक्षित, प्रदूषणमुक्त व सहज प्रवासाची सेवा मिळत असून सवलतीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास स्वस्त होणार आहे.