गरीबांच्या हात ठेल्यांवर धडक कारवाई, मात्र पीडीकेव्हीच्या जागेचे 20 वर्षांपासून अवैधपणे व्यवसायिक वापर

– बजाजनगर चौक ते काचीपुरा चौकः मनपाच्या कारवाई नोटीसवर नऊ वर्षांपासून राज्यसरकारची स्थगिती

– आमदार विकास ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नागपूर :- एखाद्या गरीबाने आपल्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी हातठेला सुरु केला तर त्याच्यावर नागपूर महानगरपालिकेचे पथक आणि वाहतूक पोलीस लगेच धडक कारवाई करतात. दंडासोबत गरीबाचा हातठेलाही जप्त करतात. मात्र बजाजनगर चौक ते काचीपुरा चौकातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (PDKV) जागेवर सुमारे दोन दशकांपासून या जागेचे सत्ताधारी पक्षाचे नेते, मोठे हॉटेल व्यवसायिकांकडून सर्व नियमांना तिलांजली देत व्यवसायिक वापर सुरु आहे. यावर कारवाई संदर्भात मनपाचे जारी केलेल्या नोटीसवर नऊ वर्षांपासून स्थगिती देत या अनियमिततेला प्रोत्साहन देण्याचे काम राज्य सरकारकडून सुरु आहे. यासंदर्भात नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून ही स्थगिती तत्काळ उठवून हे सर्व अवैध व्यवसायिक प्रतिष्ठान हटविण्याची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बजाजनगर चौक ते काचीपुरा चौक दरम्यान पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कोट्यावधी रुपयांच्या जागेवर शहरातील प्रभावी हॉटेल व्यवसायी, व्यापारी, सत्तापक्षातील नेते यांनी सुमारे 67 प्रतिष्ठान थाटले आहे. याठिकाणी रेस्टॉरन्ट, लॉन्स, शोरुम आणि गॅरेज सुरु आहे. गेल्या दोन दशकांपासून असलेल्या या अतिक्रमणाचा मुद्दा नागपूर महानगरपालिकेच्या 2015 मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत ठाकरेंनी उचलून मनपाला कारवाईस बाध्य केले होते. यानंतर या सर्व प्रतिष्ठानांना कारवाईसाठी मनपाने महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम (MRTP) अंतर्गत नोटीस दिली होती. मात्र राज्य सरकारने यावर स्थगिती देऊन या अवैध व्यवसायाला जणू मंजूरीच दिली असून गोरगरीबांसाठी एवढी तत्परता कधी दाखविली नाही. तसेच ही स्थगिती नऊ वर्षांनंतरही कायम आहे, ही दुर्दैवाची बाब.

आगीचा धोका, तरी अग्निशमन विभागाचा कानाडोळा

रेस्टॉरन्ट सारख्या प्रतिष्ठानांवर सर्वाधिक आगीच्या घटनेचा धोका असतो, म्हणून याठिकाणी अग्निशमन विभागाकडून एनओसी प्राप्त करणे आणि रेस्टॉरन्टमध्ये अग्निशमन यंत्र बसविणे अनिवार्य असते. मात्र अशा प्रकारचे कुठलीही उपाययोजना याठिकाणी करण्यात आली नाही. एमआरटीपीच्या नोटीसला स्थगिती असली तरी अग्निशमन विभाग स्वतंत्रपणे याठिकाणी कारवाई करु शकते. मात्र आर्थिक देवाण-घेवाणीमुळे अग्निशमन विभागही याठिकाणी कारवाई करत नसल्याचा थेट आरोपही यावेळी ठाकरेंनी केला आहे.

कृषी विद्यापीठाचेही आशीर्वाद

राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील संशोधन आणि शिक्षणासाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ही जमिन दिली होती. मात्र यावर अतिक्रमण होत असताना ते थांबविण्यासाठी तसेच अतिक्रमण झाल्यावर ते हटविण्यासाठी पीडीकेव्हीने कुठलीही पाऊले उचलली नाही, हे विशेष. याशिवाय एका लॉनने केलेल्या अतिक्रमणाच्या प्रकरणात न्यायालयाकडून ती लॉनची जागा तत्काळ कृषी विद्यापीठाच्या स्वाधिन करण्याचे आदेश दिले होते. यावेळीच कृषी विद्यापीठाकडून इतर अतिक्रमण करणाऱ्यांनाही न्यायालयात घेऊन जात जागा ताब्यात घेण्यासंदर्भात कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र यावर कृषी विद्यापीठाने कुठलीही कारवाई केली नाही हे विशेष. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवरही या अतिक्रमण करणाऱ्यांकडून अर्थकृपा होत असावी असा आरोपही यावेळी ठाकरेंनी केला आहे.

वाहतूकीचे नियम सामान्यांसाठीच

शहरात मोजक्याच ठिकाणी असलेल्या वाहन तळावरील पांढऱ्या रेशेच्या एक इंचही बाहेर वाहन लावल्यास वाहतूक पोलिसांकडून कारवाई करत वाहन जप्त करुन दंड वसूल करण्यात येते. मात्र या ठिकाणी दररोज शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहन रस्त्यावरच उभे असताना, याकडे वाहतूक पोलिस धृतराष्ट्र बनून असतात. त्यामुळे नियम फक्त सामान्य नागरिकासाठीच का असा सवालही याठिकाणी पडतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एकात्मिक कापूस,सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

Mon Jun 17 , 2024
मुंबई :- कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देवून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्यसाखळीस चालना देण्यासाठी राज्य शासन तीन वर्षासाठी विशेष कृती योजना राबविण्यात येत आहे. राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलवर mahadbt.maharashtra.gov.in अर्ज करण्याचे आवाहन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com