– उपायुक्त यांची केली कामाची प्रत्यक्ष पाहणी
– भाडेकरू यांचेदेखील सर्वेक्षण करणे आवश्यक
चंद्रपूर :- मराठा व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असुन उद्या २ फेब्रुवारी सर्वेक्षणाचा अंतिम दिवस आहे. या सर्वेक्षणात मनपा हद्दीत राहत असलेल्या प्रत्येक घरी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या काही प्रगणकांनी भाडेकरू राहत असलेल्या घरी सर्वेक्षण केले नसल्याचे पाहणीदरम्यान आढळुन आल्याने अश्या प्रगणकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत आहेत.
२३ जानेवारीपासुन मराठा व खुल्या प्रवर्गातील घरांचे सर्वेक्षण मनपा हद्दीत केले जात आहे. अतिशय महत्वाचे कार्य असल्याने सर्वेक्षणात एकही घर सुटू न देण्याचे निर्देश मनपा प्रशासनाद्वारे देण्यात आले होते. त्याअनुषंगाने उपायुक्त तथा सहायक नोडल अधिकारी अशोक गराटे यांनी सर्वेक्षणाची प्रत्यक्ष पाहणी केली असता ज्या ज्या घरी भाडेकरू राहत आहे त्या घरांचे सर्वेक्षण काही भागात झाले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वास्तविक घरमालक व भाडेकरू दोघांचेही सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे याची नोंद घेऊन त्या भागातील प्रगणकांनी आपले कार्य पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेत मनपाने दिले आहेत.
दरम्यान बाहेरगावी असल्याने,ठराविक वेळेत घरी उपलब्द्ध नसल्याने वा इतर काही कारणांनी ज्या कुटुंबांचे सर्वेक्षण १ फेब्रुवारीपर्यंत होऊ शकले नाही अशा कुटुंब प्रमुखांनी मनपा मुख्य झोन कार्यालय,क्षेत्रीय कर निरीक्षक अथवा मनपा मुख्य झोन कार्यालयात संपर्क करून आपले सर्वेक्षण करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.