लोकसभा निवडणुकीच्या आगामी महासंग्रामासाठी भाजपाची संघटना बळकट करा, लक्ष्य ५१ टक्के मते.

राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी आणि प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

नागपुर – लोकसभेच्या २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत होणाऱ्या महासंग्रामासाठी ‘अभी नही तो कभी नही’ या जिद्दीने कामाला लागावे. सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत आणि निवडणुकीत ५१ टक्के मते मिळविण्यासाठी संघटना बळकट करावी, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रदेश प्रभारी सी. टी. रवी तसेच प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणीसांची एक दिवसीय बैठक नागपूर येथे सोमवारी झाली. या बैठकीच्या उद्घाटनसत्रात  नेते बोलत होते. यावेळी भाजपा राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाशजी, प्रदेश सहप्रभारी जयभानसिंह पवैय्या आणि ओमप्रकाश धुर्वे, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ, संजय केणेकर, रणधीर सावरकर आणि विजय चौधरी उपस्थित होते.

सी. टी. रवी म्हणाले की, महाविकास आघाडीला लोक महावसुली आघाडी म्हणत असत. पण आता राज्यात विकासाचे डबल इंजिन असलेले सरकार आले आहे. विकासाचे राजकारण सुरू झाले आहे. पण भाजपाने आत्मसंतुष्ट होण्याचे कारण नाही. आपला संघर्ष अजूनही चालू आहे. सरकारच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायचे आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेला वारंवार सांगत राहिले पाहिजे. यासाठी संघटनात्मक जाळे बळकट करायचे आहे.

ते म्हणाले की, आगामी २०२४ च्या निवडणुकीत महासंग्राम आहे. त्यासाठी पक्षाने संघटना सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात योजना निश्चित करून काम करण्याची गरज आहे.

भाजपाचे हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि विकास हे धोरण आहे. हिंदुत्व हा केवळ भाजपाचा नाही तर देशाचा आत्मा आहे. देशावर जेव्हा जेव्हा संकट आले त्यावेळी महाराष्ट्राने योगदान दिले आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यातील विविध जिल्ह्यांचा प्रवास करताना आपल्याला आढळले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यानंतर जनतेमध्ये पक्षासाठीचा पाठिंबा वाढला असून कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. पण आगामी निवडणुकीत आपली ५१ टक्क्यांची लढाई आहे. आपल्याला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळवायची आहेत व त्यासाठी भाजपाची संघटना मजबूत करायची आहे. आगामी निवडणुकीत जेथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उमेदवार असतील तेथेही भाजपाच्या संघटनेचा पाठिंबा त्यांना उपयोगी पडेल. त्यामुळे पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आक्रमक रितीने कृतीशील भूमिकेत जावे लागेल. अभी नही तो कभी नही या जिद्दीने काम करावे लागेल.

मुरलीधर मोहोळ यांनी सूत्रसंचालन केले. उद्घाटनसत्रा नंतर झालेल्या सत्रांमध्ये श्रीकांत भारतीय यांनी जी ट्वेंटीच्या भारताच्या अध्यक्षपदाचे महत्त्व, विजय चौधरी यांनी एक भारत, श्रेष्ठ भारत, संजय केनेकर यांनी नव मतदार नोंदणी, रणधीर सावरकर यांनी बूथ स्तरावर मन की बातचे कार्यक्रम आणि माधवी नाईक यांनी फ्रेंड्स ऑफ बीजेपी याविषयी मार्गदर्शन केले. प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांनी शोकप्रस्ताव मांडला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

Tue Dec 20 , 2022
मुंबई : महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे. या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com