मुंबई : अग्निशमन दलाच्या महिला भरतीत प्रचंड गोंधळ उडाला. संतापलेल्या तरुणींनी मैदानातचं जोरदार आंदोलन केले. तरुणींना हुसकावून लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. पोलिसांनी तरुणींवर सौम्य लाठीचार्ज देखील केला. यामुळं येथील वातावरण चांगलेच तापले. गोपीनाथ मुंडे मैदानावर २१० महिला पदासाठी अग्निशमन दलाची भरती सुरू आहे.
प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान गोंधळ झाल्याचे दिसून आले. ज्या मुलींची ऊंची कमी आहे त्या मुलींना देखील या भरती प्रक्रियेत स्थान देण्यात आले. मात्र,ज्या मुलींची उंची पात्र आहे अशा मुलींना अपात्र ठरवल्याने या तरुणी संतापल्या आहेत. आपल्यावर अन्याय झाल्याचे म्हणत या तरुणींनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात केली.
हा सर्व प्रकार लक्षात आल्यावर मनसे कामगार सेना उपाध्यक्ष केतन नाईक यांनी त्या सर्व मुलींची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, या भोंगळ कारभार अग्निशामक दलाने थांबवावा आणि मुलींना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केतन नाईक यांनी केली आहे. मुंबई अग्निशामक दलाच्या या कारभाराबद्दल मनसे नेते केतन नाईक म्हणाले की, “आज मुंबई अग्निशामक दल भरती प्रकतीयेसाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या मुलींच्या समस्या फायर ब्रिगेड अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. जमलेल्या सर्व मुलींनी प्रामुख्याने आमची उंची व्यवस्थित मोजली नाही असा आरोप केला.जमलेल्या मुलींपैकी १० मुलींना भरती प्रक्रियेच्या ठिकाणी आत नेऊन त्यांची पुनः उंची मोजण्यात आली असता सर्व १० मुलींची उंची आवश्यक उंचीपेक्षा कमी आढळली. परंतु अश्या सर्व भरती प्रक्रिया राबवताना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसतात, परीक्षार्थ्यांना नीट मार्गदर्शन दिले जात नाही.यावर शासनानेच (SOP) नियमावली तयार करून भविष्यातील भरती प्रक्रिया राबवायला हव्या”, असे ते म्हणाले. तसेच, सकाळपासून भरतीसाठी आलेल्या मुलांना पाणी,अल्पोपहार व राहण्याची सोय मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यथाशक्ती नुसार केल्याची माहिती देखील केतन नाईक यांनी दिली.