– पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या ६६ खेळाडूंचे पथक सज्ज
– पदार्पणात अर्धशतक साजरे करण्याचे लक्ष्य
– खेलो इंडिया पॅरा स्पर्धा
– विजय संतान पथक प्रमुख
– उदय जोशी नोडल अधिकारी
– सहा क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा सहभाग
पुणे :- क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) यांचा एकत्रित उपक्रम असलेल्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेसाठी आता सर्वच राज्य सज्ज झाली आहेत. महाराष्ट्राचे खेळाडू देखील तयार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे ६६ खेळाडूंचे पथक जाणार असून त्यामध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा देखील समावेश आहे. या स्पर्धेदरम्यान विजय संतान हे या पथकाचे प्रमुख असतील. संघाचे नाोडल अधिकारी म्हणून उदय जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
ही पहिली खेलो इंडिया पॅरा स्पर्धा १० डिसेंबरपासून नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. केंद्र सरकार या स्पर्धेसाठी, तर दिल्ली पाहुण्या खेळाडूंच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. स्पर्धेत सेनादलासह ३२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून दीड हजारहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या तीन मैदानावर पार पडणार आहे. याममध्ये इंदिरा गांधी स्टेडियम, तुघलकाबाद येथील शूटिंग रेंज जवाहरलाल नेहरु या मैदानांचा समावेश आहे.
महाराष्ट्र संघाबरोबर १६ जणांचा सपोर्ट स्टाफही जाणार आहे. संघ व्यवस्थापक म्हणून अरुण पाटील यांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धेत एकूण सात क्रीडा प्रकारांचा समावेश असून, महाराष्ट्र पॅरा ॲथलेटिक्स, पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस, पॅरा तिरंदाजी, पॅरा वेटलिफ्टिंग आणि पॅरा नेमबाजी या सहा क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहे. पर्सी फटबॉल या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राचा संघ सहभागी होणार नाही.
या स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालय आणि साईच्यावतीने खेळाडूंच्या वातानुकुलीत रेल्वे (थ्री टायर एसी) प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी पुढाकार घेऊन यात भर घालून आपल्या खेळाडूंचा प्रवास अधिक सुखकारक व्हावा, यासाठी सर्व खेळाडूंना विमानाने दिल्लीला पाठविण्याचा निर्णय आहे .
*राज्याचे खेळाडू उत्तुंग यश मिळवतील – संजय बनसोडे*
पॅरा क्रीडा स्पर्धेतील खेळाडू नेहमीच आपल्यातील शारीरिक क्षमतेला आव्हान देत आपले कौशल्य दाखवतात. सरकारच्या या नव्या उपक्रमाने पॅरा खेळाडूंमध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण असते. या वेळी या खेळाडूंना खेलो इंडियासारखे भव्य व्यासपीठ मिळाले आहे. या पहिल्या स्पर्धेतील कामगिरींबाबत खेळाडूंइतकीच त्याच्या कुटुंबिय आणि चाहत्यांमध्ये चर्चा आहे. त्यांच्यामध्येही एक वेगळात उत्साह संचारला आहे. हे खेळाडू आपल्या कामगिरीने निश्चितपणे भावी पिढीसमोर कसे खेळायचे आणि कसे जगायचे यासाठी एक प्रेरणा स्त्रोत बनून राहतील, यात शंकाच नाही. यापूर्वीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया स्पर्धा गाजवली आहे. मात्र आता पहिल्यांदाच दिव्यांग खेळाडूंची स्पर्धा होत आहे. त्यामुळे आपले खेळाडू देखिल या स्पर्धेत उत्तुंग यश मिळवूनच परत येतील असा विश्वास वाटतो, असे महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे म्हणाले.