– पर्यावरण पूरक विकासासाठी वृक्षसंवर्धन आवश्यक: राधाकृष्णन बी यांचे प्रतिपादन
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत मनपा क्षेत्रात असणाऱ्या विविध वृक्षांची गणना केल्या जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात सोमवार (ता. २४) रोजी शहरातील २६२ वर्ष जुन्या पिंपळाच्या वृक्षाचे नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. यावेळी शहरांच्या पर्यावरण पूरक विकासासाठी वृक्षसंवर्धन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले.
याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, मनपाचे उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, उप अभियंता सुनील गजभिये, पंडित उकेबांते, संजय गुजर, टेराकॉन इकोटेक प्रा. लिमिटेडचे प्रमुख अशोक जैन यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र (नागरीक्षेत्र) वृक्षसंवर्धन कायदा (Arboriculture Act) अंतर्गत शहरातील वृक्ष गणना केल्या जाते. त्यानुसार नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणनेला सुरुवात करण्यात आली आहे. सर्वप्रथम धर्मदाय आयुक्त कार्यालयाजवळच्या चिटणवीस यांच्या जागेवर असलेल्या शहरातील २६२ वर्ष जुन्या पिंपळ्याच्या वृक्षाचे मनपा आयुक्तांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष अत्यंत गरजेचे, तसेच शहराच्या पर्यावरण पूरक विकासासाठी वृक्षसंवर्धन करणे आवश्यक आहे. याकरिता शहरातील वृक्षांची गणना करणे आवश्यक आहे. यापूर्वी मनपातर्फे प्रथमत: वर्ष 2011 साली वृक्षगणना करण्यात आली असून, त्यानुसारनागपूर शहरातील वृक्ष संख्या २१,४३,८३८ इतकी आहे, सध्यस्थितीत नागपूरची वृक्षसंख्या २५ लाखांपेक्षा जास्त असण्याचे अनुमानित आहे. नागपूर शहर २२२ स्के.किमी भागात विस्तारित असून, नागपूर शहराच्या नवीन प्रभाग रचनेनुसार व त्यात समाविष्ट करण्यात आलेली गावे हुडकेश्वर व नरसाळा इत्यादींचा समावेश करून, नव्याने वृक्ष गणना करण्यात येणार आहे. त्यानंतर आजपासून ही वृक्ष गणना करण्यास सुरुवात करण्यात आली असून, यंदाची वृक्ष गणना अत्यंत महत्वाची आहे. यंदा वृक्ष गणनेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मनपातर्फे करण्यात येणार आहे. जीआयएस व जीपीएस पद्धतीने वृक्षगणना करण्यात येणार आहे. याशिवाय हेरिटेज वृक्षांची माहिती व संख्या, अंदाजे वय, छायाचित्र आदी बाबी पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसह पर्यावरण अभ्यास, विद्यार्थी, व्यावसायिक आदींना होणार आहे..या कामासाठी जवळपास ११ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. नागरिकांनी देखील या कामासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी यांनी यावेळी केले.
वृक्षगणना करण्यासाठी टेराकॉन इकोटेक प्रा. लिमिटेड यांची नियुक्ती करण्यात अली आहे, या कंपनीचे प्रमुख अशोक जैन यांनी सांगितले की, वृक्षाचे मराठी, इंग्रजी आणि बॉटॅनिकल नावासह एकूण ३४ प्रकारची विविध माहिती संकलित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच प्रत्येक वृक्षाला स्वतंत्ररित्या युनिक आय. डी. राहणार आहे.