उत्तर मुंबईतील रखडलेले प्रकल्प ,रस्ते कामे मार्गी लागणार – केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची ग्वाही

– कांदिवली येथे क्रीडा प्रशिक्षण संकुल उभारणार

मुंबई :- मुंबई महानगरपालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, म्हाडा आणि एमएमआरडीए च्या अधिका-यांसोबत बुधवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये उत्तर मुंबई आणि मुंबईतील रखडलेले विविध प्रकल्प कामे मार्गी लावण्यासंदर्भात तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी बुधवारी दिली. भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, आ. योगेश सागर, आ.मनीषा चौधरी, आ.सुनील राणे, भाजपा प्रदेश प्रवक्ता गणेश खणकर, ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.

गोयल यांनी सांगितले की,या बैठकीमध्ये कांदिवली येथे 37 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्याबाबतचा प्रकल्प वेगाने मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या 20-25 वर्षांपासून रखडलेल्या या राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा मार्ग आजच्या बैठकीनंतर मोकळा झाला आहे. याठिकाणी भविष्यात आशियाई, राष्ट्रीय, राष्ट्रकुल आणि ऑलिम्पिक स्तरावरचे खेळाडू प्रशिक्षित केले जातील. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांमुळे मुंबईकरांचे जीवन सुखकर होणार आहे असेही  गोयल यांनी नमूद केले.

गोयल यांनी सांगितले की उत्तर मुंबई आणि उर्वरित मुंबईमध्ये अर्धवट आणि रखडलेले विविध प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून युद्धस्तरावर काम करत आहे.बोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे उद्यान आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल यांच्या सर्वांगीण विकासासाठी विस्तृत चर्चा करून त्याबाबत अहवाल लवकरच सादर करून तेथे क्रीडा सुविधा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी असे प्रकल्प महत्वाचे असून ते पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे सुरू आहेत अशी माहिती  गोयल यांनी दिली.

कांदिवली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या दोन महिन्यांत आणि शिंपोली येथील कौशल्य विकास केंद्र येत्या 6-8 महिन्यांत सेवेत रुजू होईल अशी ग्वाही गोयल यांनी दिली.या बहुविद्याशाखीय केंद्रांमुळे पालघरपर्यंतच्या रहिवाशांना लाभ होणार आहे. मुबईकरांची वाहतुकीची समस्या सोडवून जीवन सुखकर करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे  गोयल यांनी सांगितले. आकुर्ली पश्चिम द्रूतगति मार्गावरील अंडरपासचे काम रखडले होते त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या होती. मात्र बैठकीमध्ये एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी ते काम येत्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी टाटा कंपनीला वाहतूक व्यवस्थापन आराखडा बनवण्याची विनंती केली असल्याची माहिती गोयल यांनी दिली. सह पोलीस आयुक्तांशी चर्चा करून वाहतूक कोंडी होणा-या ठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याची विनंती करून एक सर्वसमावेशक योजना तातडीने आखली जाणार आहे. प्रत्येकाला हक्काचे घर देण्याच्या दिशेने रखडलेल्या गृह आणि पुनर्विकास प्रकल्पांबाबतही बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ( एसआरए) नोडल एजन्सी म्हणून नियंत्रण ठेवून कामे पूर्ण करून घेणार असल्याची माहितीही गोयल यांनी दिली. पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड मां के नाम’ या योजनेनुसार उत्तर मुंबईमध्ये मुंबई महानगर पालिकेतर्फे एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार आहे, असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राजे फॉउंडेशन कन्हान व्दारे शाळेतील विद्यार्थ्यां ना बुट व मोजे वाटप केले

Wed Aug 14 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- १५ ऑगस्ट स्वातंत्र दिनी शाळेतील विद्या र्थ्यानी बूट मोजे घालुन शिस्तीत स्वातंत्र दिन उत्साहा त साजरा करता यावा.या सार्थ हेतुने राज फॉऊंडेशन कन्हान व्दारे पंडित जवाहारलाल नेहरू विद्यालयातील गरजु शंभर विद्यार्थ्याना बूट व मोजे वाटप करण्यात आले. स्वातंत्र्य दिन उत्साहाने थाटात साजरा करित असताना समाजातील काही संस्था अश्या पण आहेत ज्या आपला आनंद दुसऱ्यां […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!