2 जानेवारीपासून क्रिडा महोत्सवास शुभारंभ
नागपूर :- महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा 2022 चे आयोजन 23 वर्षानंतर प्रथमच महाराष्ट्रात 1 ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत एकूण 39 क्रीडा प्रकारात शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, मुंबई व नागपूर संत्रानगरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. जिल्ह्यात महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेतील बॅडमिंटन, हॅण्डबॉल, नेट बॉल व सेपक टेकरा या चार क्रीडा स्पर्धाचे 2 ते 8 जानेवारी 2023 या दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेच्या आयोजनानिमित्त संपूर्ण राज्यात वातावरण निर्मिती होणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या आयोजनाची भव्यता जनसामान्यांना ज्ञात होण्याच्या दृष्टीने तसेच कोरोना महामारीनंतर विद्यार्थ्यांचा कल मोबाईलकडे वळला असून त्यांना पुन्हा खेळाविषयी आवड निर्माण व्हावी व या स्पर्धेतून त्यांचे स्पोर्ट करिअर घडावे, यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडा व युवक सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी छात्रक, भंडाऱ्याच्या जिल्हा क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, हँडबॉल संघटनेचे सुनील भोतमांगे, शिव छत्रपती पुरस्कार अवार्डी योगेंद्र पांडे, बॉल संघटनेचे विपीन कामदार, ललित जीवाणी, जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अमंत आपटे, आदी यावेळी उपस्थित होते.
नुकतेच महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या लोगोचे अनावरण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीष महाजन, विरोधी पक्षनेते तथा अध्यक्ष महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक संघटना अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या स्पर्धेचे 5 जानेवारी सायंकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व क्रीडा मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
जनमानसात महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धेबाबत जागृती व्हावी तसेच मोबाईल क्रांतीमुळे दिवसेंदिवस क्रीडा स्पर्धांकडे विद्यार्थ्यांमध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, तो दुर व्हावा यासाठी या स्पर्धाचे अयोजन करण्यात आले. त्यासोबतच येत्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंमध्ये वातावरण निर्मिती व्हावी, हाच या स्पर्धेचा उद्देश असून एकाच स्पर्धेत अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगून क्रिडा प्रेमी, खेळाडू व नागरिकांनी या स्पर्धांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.