नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि स्वस्थ नागपूर शहर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने शनिवार (ता.१) सकाळी राबविलेल्या “एक तारीख- एक तास- एक साथ” या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. मनपाच्या दहाही झोन मधील नागरिकांनी उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत श्रमदान केले.मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी आणि अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला स्वच्छता कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले आहे.
मनपाच्या दहाही झोन मधील विविध ठिकाणी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यात लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या एच बी इस्टेट, सोनेगाव तलाव, धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या दाभा रोड, मारुती शोरूम अमरावती रोड (प्रभाग 13), हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर नगर (प्रभाग ३४), धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या महाजन चक्की, मनीष नगर (प्रभाग ३३),नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या समोसा मैदान बडा ताजबाग (प्रभाग ३०),गांधीबाग झोन अंतर्गत येणाऱ्या नाग नदी पुलिया (प्रभाग १८), सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या दोंडपुरा शांतीपुरा (प्रभाग 21) लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या मिनिमाता नगर, गुजरी मनपा शाळेजवळ (प्रभाग 24),आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या रमाई उद्यान लघुवेतन कॉलनी, इंदोरा, मंगळवारी झोन अंतर्गत येणाऱ्या गिट्टीखदान (प्रभाग १०) येथे नागरिकांनी अस्वच्छ परिसराची साफसफाई करुन परिसर स्वच्छ केला.
रस्त्यावरील पालापाचोळा, झाडाच्या फांद्या आदी उचलून कचरा गाडीत टाकण्यात आले. तसेच स्वच्छ करण्यात आलेला परिसर पुन्हा अस्वच्छ होवू नये, लोक तिथे पुन्हा कचरा टाकू नये म्हणून त्या ठिकाणी संबंधित झोनचे सहायक आयुक्त यांच्या मार्फत जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी या सर्वांनी स्वच्छतेसाठी श्रमदानाच्या या उपक्रमात सक्रियपणे सहभाग नोंदविला.