स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम; कर्ण व दंत तपासणीचीही सुविधा
नागपूर :- स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या निःशुल्क नेत्र, कर्ण व दंत तपासणी अभियानाला अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात सहभागी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आतापर्यंत प्रदर्शनातील शेकडो शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून दाभा येथे आयोजित मध्य भारतातील सर्वांत मोठ्या कृषी प्रदर्शनात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व इतर राज्यांमधील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. विविध विषयांवरील परिषद व कार्यशाळांना शेतकरी व कृषी क्षेत्रातील अभ्यासक हजेरी लावत आहेत. याशिवाय याठिकाणी असलेल्या स्टॉल्सलाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या परिसरातच स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नेत्र, कर्ण व दंत तपासणी अभियान राबविले जात आहे. खेड्यापाड्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांचे डोळे तपासून त्यांना आवश्यकता भासल्यास चष्मा दिला जात आहे. याशिवाय ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, अशांना त्यासंदर्भातील मार्गदर्शन केले जात आहे. डॉ. संजय लहाने, डॉ. अवंतिका वाडेकर, डॉ. निमिता बडोले, विलास सपकाळ यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांची नेत्र, कर्ण व दंत तपासणी सुरू आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिबिराला भेट
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी नेत्र तपासणी शिबिराला भेट देऊन माहिती घेतली. यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या शेतकरी बांधवांनी नेत्र, कर्ण व दंत तपासणीची निःशुल्क सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल ना. गडकरी यांचे आभारही मानले.