– स्वच्छ मोहल्ला जनजागृती कार्यक्रम
नागपूर : स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ नागपूर साकारण्यासाठी नागपूर महानगरपालिका (NMC) आणि नागपूर@2025 यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेंतर्गत स्वच्छता विषयी जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ मोहल्ला स्पर्धेच्या अनुषंगाने स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात मेडिकल चौक, हनुमान नगर उद्यानात जनजागृतीसाठी फ्लॅश मॉब, पथनाट्य आणि प्लॉगिंग मोहिम राबविण्यात आली.
याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी, घनकचरा व्यवस्थापक संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त अशोक पाटील, nagpur@2025चे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्हार देशपांडे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थिती होती. या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सकाळी-सकाळी हनुमान नगर गार्डन येथे ‘नागपूर प्लॉगर्स अँड लीडर्स क्लब’.’ यांच्या सहकार्याने फ्लॅश-मॉब आणि ‘नुक्कड नाटक’ सादर करण्यात आले. तर मेडिकल चौक येथे मॅट्रिक्सवॉरियर्स यांच्या सहकार्याने प्लॉगिंग मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात शेकडोच्या संख्येत नागपूरकरांनी सहभाग नोंदविला.
उपक्रमादरम्यान मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी ‘स्वच्छ मोहल्ला’ स्पर्धेचे महत्त्व समजावून सांगितले, तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगत नागपूरला स्वच्छ सुंदर आणि स्वस्थ साकारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. नागरी सोयी सुविधांसाठी मनपा नेहमी तत्पर असल्याचे सांगत त्यांनी स्वच्छ मोहल्ला स्पर्धेसाठी नागरिकांना प्रेरित केले.
उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले यांनी घनकचरा व्यवस्थापना विषयी नागरिकांना माहिती दिली. तर Nagpur@2025 चे श्री. मल्हार देशपांडे यांनी नागरिकांशी संवाद साधला.