बालकांच्या लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन
नागपूर :- संपूर्ण राज्यात गोवरचा संसर्ग वाढत आहे. अशात सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर शहरात सुरू असलेल्या बालकांच्या प्रतिबंधात्मक लसीकरणाची गती वाढवून जास्तीत जास्त बालकांना कमीत कमी वेळेत लस दिली जाईल यासंदर्भात कार्यवाही करा, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले.
वाढत्या गोवर संसर्गाच्या अनुषंगाने मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहामध्ये शहरातील दहाही झोनच्या कार्यवाहीचा मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, नोडल अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. साजिद खान यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
गोवर आणि रुबेला या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्यात व्यापक लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत नागपूर शहरात ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील १०६ गोवर संशयीत बालके आढळली. यापैकी २ मुलांना गोवर असल्याचे निष्पन्न झाले व वेळीच उपचारानंतर ते बरेही झाले. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने लसीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली. २०२२-२३ या वर्षात ४३३१० मुलांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य आहे. यापैकी आतापर्यंत २३३९७ बालकांना (५४ टक्के) पहिला डोस देण्यात आला तर दुसरा डोस २१४१७ बालकांना (५० टक्के) देण्यात आला आहे. गोवर संसर्गाचा वाढता धोका पाहता त्यापासून शहरातील बालकांची सुरक्षा व्हावी यासाठी सर्व पात्र बालकांचे लसीकरण आवश्यक आहे. त्यासाठी झोन स्तरावर लसीकरणाची गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी बैठकीत दिले.
गोवर आणि रूबेला आजार समूळ नष्ट करण्यासाठी नागपूर शहरातील प्रत्येक बालकाला लस देण्यात यावी यासाठी आरोग्यसेविका, आशा वर्कर तसेच प्राथमिक उपचार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी सक्रीय सहभाग नोंदविला आहे. याशिवाय बांधकाम स्थळे, शाळाबाह्य विद्यार्थी यांचाही शोध घेऊन त्यांना लस दिली जात आहे. बैठकीत नोडल अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे यांनी सादरीकरणाद्वारे शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली.
प्राथमिक आरोग्य केन्द्रांमध्ये गोवर आणि रुबेलाची लस नि:शुल्क उपलब्ध
नागपूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्रांमध्ये गोवर आणि रुबेलाची लस 9 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या बालकांकरीता नि:शुल्क उपलब्ध करण्यात आली आहे. लसीकरण करुन आपल्या बाळांना गोवर आणि रुबेलाच्या संभावित धोक्यापासून दुर ठेवण्याचे आवाहन म.न.पा.आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, त्यासाठी विशेष अभियान राबविण्यात यावे आणि यासाठी जनप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांचे सुध्दा सहकार्य घ्यावे. सन 2023 पर्यंत गोवर आणि रुबेलाचे समुळ उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. आयुक्त म्हणाले की, संशयीत रुग्णांची माहिती प्राप्त करण्यासाठी घरो-घरी भेट दया, यासाठी आशावर्कर, अंगणवाडी सेवीकांची मदत घ्या. संशयीत रुग्णांच्या घरा शेजारच्या मुलांचेही लसीकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच 5 वर्षापर्यंतच्या बालकांना जिवनसत्व “अ” चा डोज देण्यात यावा. हा डोज सर्व शासकीय प्राथमिक केन्द्रांमध्ये नि:शुल्क उपलब्ध आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार यांनी दिली.
लसीकरणासाठी सहकार्य करा
गोवरपासून बालकांना सुरक्षित ठेवण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. यासाठी काही भागात केवळ चुकीची माहिती पसरवून संभ्रम निर्माण केला जातो व लसीकरणाला विरोध होत असल्याचे दिसून येत आहे. ही चुकीची बाब असून बालकांच्या लसीकरणासाठी शहरातील सर्व समुदायाचे व्यक्ती, धर्मगुरू, जनप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व सर्व नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले. कोणत्याही बालकाला गोवर झाल्यास घरगुती उपचार करण्यात वेळ न घालवता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असेही आवाहन आयुक्तांनी केले आहे.
खासगी डॉक्टरांनी गोवर रुग्णांची माहिती तात्काळ दयावी
शहरातील सर्व खासगी व शासकीय डॉक्टरांना त्यांच्याकडील गोवर संशयीत बाहयरुग्ण किंवा आंतररुग्ण ची माहिती तात्काळ महानगरपालिकाचे साथरोग विभागास देणे साथरोग कायदयांतर्गत बंधनकारक आहे. तरी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.