उच्च दर्जाच्या वस्त्रांमध्ये रेशीम वस्त्रांचा समावेश होतो. कथा – पुराणांमध्येही रेशमी वस्त्रांचा उल्लेख आहे. काही हजार वर्षांपासून भारतात रेशमी वस्त्रांचा वापर होतो. इसवी सनाच्या आधी चीनमध्ये रेशमाचा वापर सुरू झाला, असा उल्लेख आहे. नंतर तो भारतात आला. भारतातील रेशीम उद्योगात महाराष्ट्राचे स्थान महत्त्वाचे आहे, त्यातही विदर्भाचा वाटा मोठा आहे. एवढेच नाही विदर्भातील ‘टसर रेशीम’ने रेशीमच्या बाजारात स्थान निर्माण केले आहे. यात रेशीम संचालनालय नागपूरचा वाटा महत्त्वाचा आहे. या रेशीम संचालनालयाची स्थापना 1 सप्टेंबर 1997 रोजी झाली होती. वर्ष 2022 संचालनालयासाठी रोप्य महोत्सवी वर्ष होते. खऱ्या अर्थाने रेशीम व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय ठरत आहे.
रेशीम उत्पादनात जगात चीनचा प्रथम तर भारताचा दुसरा क्रमांक आहे. रेशीमच्या बाजारात महाराष्ट्राच्या टसर रेशीम पैठणीला मोठी मागणी आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी परिसरात टसर आणि तुतीच्या रेशीम कापड आणि धाग्याची निर्मिती होते. टसर रेशीमच्या ‘कर्वती साडी’चा इतिहास सुमारे 400 वर्षे जुना आहे. आंधळगाव येथे कर्वती साडी विणण्याचा उद्योग पारंपरिक आहे.
टसर रेशीम उद्योग प्रामुख्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या चार जिल्ह्यात होतो. ‘ऐन’ आणि ‘अर्जुन’ वृक्ष असलेल्या वन क्षेत्रात आदिवासी टसर रेशीमचे उत्पादन घेतात.
महाराष्ट्र राज्य ग्रामोद्योग महामंडळामार्फत पाचगणी येथे रेशीम संशोधन केंद्र सुरू झाल्यानंतर (1956) संशोधन करून सातारा व पुणे विभागातील जिल्हयांमध्ये तुतीची लागवण करून कोषांचे उत्पादन सुरू करण्यात आले. 1970 पासून शेतकरी व्यवसाय म्हणून रेशीम शेती करू लागलेत. रेशीम शेती हा शेतीला पूरक जोडधंदा होऊ शकतो हे लक्षात आल्याने, रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1 सप्टेंबर 1997 रोजी रेशीम संचालनालय स्थापन करण्यात आले. संचालनालयाचे पहिले स्वतंत्र कार्यालय – जिल्हा रेशीम कार्यालय, नागपूर येथील कार्यालयात सुरू करण्यात आले.
महाराष्ट्रात रेशीम उत्पादनाचे प्रयोग
महाराष्ट्रात रेशीम उत्पादनाची सुरुवात 1956 मध्ये खादी ग्रामोद्योगाने पाचगणी केंद्रावर केली. 1970 मध्ये व्यावसायिक पातळीवर रेशमाची शेती सुरू झाली. जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई आणि विदर्भ विकास महामंडळामार्फत ‘रेशीम शेती उद्योग योजना’ राबविली जात होती. यात विदर्भ विकास महामंडळ ‘टसर रेशीम उद्योग योजना’ राबवत होते. टसरच्या कोषाच्या धाग्यावर प्रक्रिया करून आंधळगाव व मोहाडी परिसरात कर्वती साड्या विणल्या जात होत्या.
1 सप्टेंबर 2007 पासून, 1 सप्टेंबर हा दिवस (रेशीम संचालनालयाचा स्थापना दिवस) ‘रेशीम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
तुतीला ‘कृषी पिका’ची मान्यता
तुती रेशीम पिकाला 11 जानेवारी 2021 रोजी ‘कृषी पीक’ म्हणून मान्यता मिळाली आहे. तुतीच्या झाडाला ‘तुती वृक्षा’चा दर्जा मिळाल्यामुळे अनेक योजनात तुती पिकाला कृषी पिकांप्रमाणे लाभ मिळेल. याचा तुती उत्पादक शेतकऱ्यांना फायदा मिळेल. रेशीम हा शेतीपूरक व्यवसाय ठरू शकतो.