– ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात साधला ‘महिला व ज्येष्ठ नागरिकांशी सुसंवाद’
मुंबई :- ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून तेथे ने-आण करण्यासाठी बेस्ट मार्फत 10 बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बृहन्मुंबई पोलीस उपायुक्त परिमंडळ – 5 च्या वतीने शनिवारी सायंकाळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात मंत्री केसरकर यांनी दादर परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. ज्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे शक्य आहे, त्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी दिले.
खासदार राहुल शेवाळे, आमदार सर्वश्री कालिदास कोळंबकर, सदा सरवणकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, जिल्हाधिकारी कार्यालय, सर्व संबंधित शासकीय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस विभाग आदींचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर म्हणाले, नागरिकांना त्यांच्या समस्यांवर तातडीने न्याय मिळावा, ही शासनाची भूमिका आहे. यासाठी मुंबईसह राज्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच दर्जेदार सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचाही शासनाचा प्रयत्न आहे. मुंबईत स्वच्छता राहावी, नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, मुंबई सुंदर दिसावी यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आपला दवाखाना योजनेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी केली जात असून अधिकच्या तपासण्यासाठी फिरती तपासणी वाहने उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना धान्य घेण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता भासू नये यासाठी 14 वाहने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगून मंत्री केसरकर म्हणाले, मुंबईतील नागरिकांच्या समस्या जाणून त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. उद्याने, बाजारपेठांमध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबादेवी, महालक्ष्मी, हाजीअली, सिद्धीविनायक आदी धार्मिक स्थळांच्या परिसराचा कायापालट करण्यात येणार आहे. कोळीवाड्यांचा विकास करण्यात येत असून उत्तम फिश मार्केटसह तेथे फूड कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. कामगारांसाठी असलेल्या कल्याण केंद्रामध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या जात आहेत. ड्रग्ज मुक्त मुंबईसाठी उपाय केले जात आहेत. रूग्णांच्या सोयीसाठी जे. जे. रूग्णालयात सुसज्ज वॉर्ड तयार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
केसरकर म्हणाले, मंत्री हा नागरिकांचा प्रतिनिधी असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी रहिवाशांच्या समस्या जागेवरच सोडविण्यासाठी प्रत्येक विभागात जाऊन जनतेशी सुसंवाद साधण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागरिकांमध्ये जाऊन आणि त्यांच्या समस्या जाणून त्या तातडीने सोडविण्यात येत आहेत.
खासदार राहुल शेवाळे म्हणाले, राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात सुमारे 45 लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. मुंबईत पालकमंत्री दीपक केसरकर हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविल्या जाऊन त्यांना दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. आपला लोकसभा मतदारसंघ हा सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार सदा सरवणकर यांनी यावेळी परिमंडळ 5 या पोलीस विभागाने चोरीचा मुद्देमाल कौशल्याने शोधून काढल्याबद्दल त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. तर आमदार कालिदास कोळंबकर यांनी पोलिसांचा घरांचा विषय अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून शासनाने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पालकमंत्री मंत्री केसरकर यांच्याकडे केली.
यावेळी मंत्री केसरकर यांच्या हस्ते पोलीस तपासात परत मिळविलेला 40 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकांना परत करण्यात आला. यामध्ये कुर्ला पोलीस स्टेशन हद्दीतील मनोज जैन यांचे 28 लाखांचे दागिने, धारावी हद्दीतील तीन लाख रुपयांची कार यांसह दादर, माहीम आदी पोलीस स्टेशन हद्दीतील गहाळ झालेले अथवा चोरीला गेलेले विविध दागिने, मोबाईल, घड्याळ, वाहने आदी मुद्देमालाचा समावेश होता. सुमारे दोन कोटींहून अधिकचा मुद्देमाल आतापर्यंत परत करण्यात आल्याची माहिती यावेळी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी प्रास्ताविकात दिली. पोलीस विभागाच्या या कामगिरीची मंत्री केसरकर यांनी प्रशंसा केली.
या सुसंवाद कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, स्वच्छता, वाहतुकीच्या समस्या, कचरा निर्मूलन, फेरीवाले, पार्किंग आदींचा समावेश होता. या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश पालकमंत्री केसरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.