– मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार उदघाटन
नागपूर :- नागपूर शहरातील मनीषनगर येथील रेल्वे अंडर ब्रिजचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्याचे उदघाटन उद्या म्हणजेच २८ जानेवारी मंगळवार रोजी संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली या रेल्वे अंडर ब्रिजचा उदघाटन सोहळा पार पडेल. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उदघाटनानंतर लगेचच हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल.
या प्रकल्पाची एकूण लागत ३३.८३ कोटी रुपये असून, आरयूबीची लांबी १९० मीटर, रुंदी ८ मीटर आणि उंची ४ मीटर आहे. आरयूबीचे निर्माण मुंबई-हावडा व दिल्ली-चेन्नई या निरंतर व्यस्त रेल्वे मार्गावर करण्यात आले आहे. या अंडर ब्रिजमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र पादचारी मार्ग देखील उपलब्ध करण्यात आला आहे.
आरयूबीमुळे मनीषनगर परिसर आणि वर्धा मार्ग यांच्यात चांगली कनेक्टिव्हिटी होईल. याचा मोठा फायदा मनीषनगर, बेसा, घोगली आणि बेलतरोडी येथील लाखो नागरिकांना होईल. रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या त्रासापासून मुक्ती मिळेल तसेच यामुळे या परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्ती मिळेल, तसेच मनीषनगर येथील रहिवाश्यांना वर्धा मार्गावर सहज प्रवेश मिळवता येईल. उद्घाटनानंतर लोकांना अखंड येण्याजाण्यासाठी सुलभता मिळेल. क्रॉसिंगवर होणारा जामचा त्रास दूर होईल आणि त्यासोबतच प्रवासात वेळेचीही बचत होईल.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी अभिजीत वंजारी आमदार, डॉ. नितीन राऊत आमदार, उत्तर-नागपूर, कृष्णा खोपडे आमदार, पूर्व-नागपूर. सुधाकर अडबाले आमदार, मोहन मते आमदार, दक्षिण-नागपूर. डॉ. परिणय फुके आमदार प्रविण दटके आमदार, मध्य-नागपूर कृपाल तुमाने आमदार विकास ठाकरे आमदार, पश्चिम-नागपूर. विजयलक्ष्मी बिदरी (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त, श्रावण हर्डीकर (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक- महा मेट्रो, डॉ. विपीन इटनकर (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, नागपूर, अभिजित चौधरी (भा.प्र.से.) आयुक्त, नागपूर महानगरपालिका, संजय मीणा (भा.प्र.से.) सभापती, ना.सु.प्र. व आयुक्त (एनएमआरडीए) तसेच दिनेश नंदनवार -मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, विनायक गर्ग – विभागीय रेल्वे व्यवस्थापक,सेंट्रल रेल्वे हे मुख्यत्वाने उपस्थित राहणार आहेत.