– स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटासोबत – संवाद
यवतमाळ :- दिग्रस तालुक्यातील ग्रामपंचायत कळसा येथे उमेद आणि प्रकल्प संचालक पाणी व स्वच्छता यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छतेचे काम स्वच्छ बचतगटासोबत संवाद मोहिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आवश्यक असल्याचे यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर यांनी सांगितले.
यावेळी सरपंच हरीश मनवर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश नाटकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी राहुल डाखोरे, शालेय स्वच्छता सल्लागार भारत चव्हाण, उमेदचे नरेंद्र राठोड, मुकेश यादव तसेच ग्रामपंचायत कर्मचारी, बचतगटाच्या महिला उपस्थित होत्या.
कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीने महिला बचतगटाचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु गावामध्ये बऱ्याच ठिकाणी कचरा व सांडपाणी साचत असल्यामुळे विविध आजाराची लागण होवून जिवीत हाणी होवू शकते. त्यामुळे आजावरील उपचाराकरीता खर्चामध्ये सतत वाढ होत आहे. आर्थिकदृष्टया गरीब कुटूंबांना याचा फटका बसतो.
गावातील बचतगटाने सांडपाणी व घनकचऱ्याचे योग्य पध्दतीने व्यवस्थापन केल्यास फार मोठी आर्थिक बचत होतील. त्यामुळे कुटूंबाचा पर्यायाने गावाचा आर्थिक व सामाजिक दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन प्रकाश नाटकर यांनी केले. कचऱ्यापासून उत्तम दर्जाचे सेंद्रीय खत तयार होऊन बचत गटाला व्यवसाय सुध्दा उपलब्ध होवु शकते, असे त्यांनी सांगितले.
नियोजन समिती सदस्य सुधीर देशमुख यांनी सांडपाणी व घनकचऱ्याचे नियोजन करुन आरोग्य सुदृढ ठेवावे, असे आपल्या भाषणात सांगितले. सहायक गट विकास अधिकारी राहुल डाखोरे यांनी कचऱ्यापासून सेंद्रीय खताची निर्मिती करण्याचा व्यवसाय करावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शालेय सल्लागार भारत चव्हाण यांनी केले. संचलन सहायक शिक्षक हिराकांत बोबडे यांनी केले तर आभार ग्रामसेवक संतोष सोळंके यांनी मानले.