नागपूर :- सौर ऊर्जेचे महत्त्व व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या संकल्पनेबाबद माहिती देण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि जैन एरिगेरियन सिस्टीम ली. तर्फ़े नागपुर परिमंडलातील विविध गावांतील शेतक-यांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात येत आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत सौर कृषी पंपाचे प्रात्याशिक दाखवून त्यामाध्यमातून शेतक-यांना सौर ऊर्जेचे महत्व कळावे यासाठी महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके आणि अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांनी त्यांच्या विविध वरिषठ अभियंत्यांसमवेत शेतक-यांसोबत प्रत्यक्ष संवाद सुरु केला आहे. यांतर्गत सावनेर विभागातील कळमेश्वर उपविभाग अंतर्गत असलेल्या उपरवाही या गावात 3, 5 आणि 7.5 एचपी क्षमतेच्या सौर कृषी पंपाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या योजनेत शेतकऱ्यांना जमिनीच्या क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एचपीपर्यंतचे पंप मंजूर होतात. शेतकऱ्यांना सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्स व कृषी पंप असा सर्व संच केवळ दहा टक्के रक्कम भरून मिळतो. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा केवळ पाच टक्के आहे. शेतकऱ्यांना ऊर्वरित रक्कम केंद्र व राज्य सरकारकडून सबसिडीच्या स्वरुपात मिळते. सौर ऊर्जा निर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसविला की, शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन मिळते. शेतकरी पारंपरिक ग्रीडमधून मिळणाऱ्या वीज पुरवठ्यावर अवलंबून राहत नाही तसेच त्याला बिलही येत नाही. सिंचनासाठी केवळ दिवसा वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या सोईचे होते. राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांकडून तिला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ऑनलाईन अर्ज भरणे सुरू
महाराष्ट्र शासनाद्वारे आता ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ दिला जात आहे. यासंबंधी अधिकृत अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वतीने करण्यात आली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज देखील आता सुरू झाले आहेत. यासाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, त्यामुळे आता सर्व इच्छूक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सौर कृषी पंप मिळणार आहे. काटोल, कोंढाळी, सावनेर, मौदा, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही सह नागपूर जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सौर कृषी पंप देण्याचा उद्देश या योजनेचा आहे. कृषी पंप पाहिजे असेल, तर तुम्हाला फक्त ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, दुसरं काहीच करण्याची गरज नाही, अशी माहिती महावितरणतर्फ़े यावेळी उपस्थित शेतक-यांना देण्यात आली.