नागपूर :- नागपूर शहरात 10 महिन्यात ५७ डेंग्यू रुग्णांची आणि २ मलेरियाच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. डासांपासून होणा-या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी परिसरात स्वच्छता राखावी. कुठल्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
नागपूर शहरातील डेंग्यू आणि मलेरिया रुग्णांची माहिती मनपाच्या मलेरिया विभागामार्फत जारी करण्यात आली आहे. मलेरिया व हिवताप अधिकारी डॉ. जास्मीन मुलानी यांचानुसार जानेवारी २०२२ ते ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये शहरात डेंग्यू सदृश्य लक्षणे असलेल्या ३५५ संशयीत रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यापैकी ५७ रुग्ण डेंग्यू बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. सप्टेंबर २०२२ या महिन्यात सर्वाधिक २४ रुग्णांची नोंद झाली आहे तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी १० रुग्ण आढळले. ऑक्टोबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात अर्थात ७ ऑक्टोबर पर्यंत ६ रुग्ण, जून महिन्यात ३ रुग्ण, जानेवारी आणि मे महिन्यात प्रत्येकी २ रुग्णांची अशा एकूण ५७ रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच खाजगी आणि शासकीय रुग्णालयातील सर्व डेंग्यू रुग्णांची नोंद मनपाच्या मलेरिया फायलेरिया विभागात केली जाते.
याशिवाय आतापर्यंत मलेरियाच्या २ रुग्णांची नोंद झालेली आहे. फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात प्रत्येकी एक मलेरिया संशयीत रुग्णांची नोंद झाली. चाचणीनंतर दोन्ही रुग्णांना मलेरिया असल्याचे निदर्शनास आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या अत्यल्प आहे. मनपातर्फे किटकनाशक फवारणी व डास निमंत्रण उपाययोजना झोननिहाय राबविण्यात येत आहेत. किटकसंग्राहकाव्दारे डासांची घनतेप्रमाणे कार्यवाही केल्यामुळे ब-याचपैकी नियंत्रण शक्य झाले आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता डेंग्यू किंवा मलेरिया सदृश्य लक्षणे असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आपल्या जवळच्या मनपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाउन नि:शुल्क चाचणी आणि औषधोपचार करून घ्यावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.