-एसी कोच अटेंडंट्सने दिल्लीहून आणली खेप
– संपर्क क्रांती एक्सप्रेसची झाडाझडती
नागपूर :-रेल्वेत प्रवाशांच्या मदतीसाठी असलेल्या खाजगी कामगारांकडूनच मद्य तस्करी केली जात असल्याच्या गुप्त माहितीवरून आरपीएफ आणि गुन्हे शाखेच्या पथकाने संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये कारवाई केली. कोच अटेंडंट केबिनमधून चार बॅग जप्त करण्यात आल्या. बॅग्जमध्ये एक लाख 34 हजार रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या महागड्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई नागपूर रेल्वे स्थानकावर रात्री करण्यात आली.
कृष्णमोहन सिंह (31), संजीव कुमार (25), दोन्ही रा. गाजियाबाद अशी अटकेतील कोच अटेंडट्ंसची नावे आहेत. ते नेहमीच दारूची तस्करी करतात, अशी गुप्त माहिती आरपीएफला होती. एक पथक बर्याच दिवसांपासून त्यांच्या पाळतीवर होते. मात्र, पथकाला यश येत नव्हते. रविवारी नागपूरला येणार्या संपर्क क्रांती एक्सप्रेसचे कोच अटेंडंट दारूची तस्करी करीत आहेत. त्यांच्याकडे दारूचा साठा असून, दिल्लीहून सिकंदराबाद घेऊन जात असल्याची गुप्त माहिती आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक नवीन प्रतापसिंग यांना मिळाली. खात्रीलायक माहिती असल्याने त्यांनी एक पथक तयार केले. या पथकात गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक आर. के. भारती, मुकेश राठोर, जसवीर सिंह तसेच आरपीएफ ठाण्याचे उपनिरीक्षक एस. एस. मडावी, जुम्मा इंगळे, टॉपराम राहंगडाले, देवेंद्र पाटील यांच्यासह श्वान पथकाचा समावेश होता.
रात्री 10 वाजताच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर संपर्क क्रांती एक्सप्रेस आली. पथकाने बी-1 डब्याचा ताबा घेतला आणि झाडाझडती घेतली. दरम्यान कोच अटेंडंट्सच्या केबिनची झडती घेत असताना ब्लँकेट आणि बेडरोल ठेवण्याच्या ठिकाणी चार बॅग आढळल्या. बॅगमध्ये विविध कंपन्यांच्या महागड्या दारूच्या 64 बाटल्या आढळल्या. यानंतर कोच अटेंडंट्स कृष्णमोहन आणि संजीव कुमारला ठाण्यात आणण्यात आले. त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. कागदोपत्री कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ठाण्यात पोहोचले. पुढील कारवाईसाठी आरोपीसह मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला.