महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून

नागपूर :- वीज ग्राहकांना बिलाबाबत पारदर्शी आणि अत्यंत अचूक सेवा मिळण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या स्मार्ट मीटर बसविण्यास महावितरणने स्वतःपासून सुरुवात केली असून महावितरणची 18 कार्यालये आणि कर्मचारी निवासमधील 323 सदनिका अशा 34१ वीज ग्राहकांसाठी स्मार्ट बसविण्यात आले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविताना सर्वप्रथम महावितरणची कार्यालये आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांमध्ये स्मार्ट मीटर बसविण्याची सूचना केली आहे. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वरदान ठरणाऱ्या या उपक्रमामध्ये महावितरणने स्वतःपासून सुरुवात करून उदाहरण घालून द्यावे, असे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरात 60, गोंदियामध्ये 146, वर्धा येथे 30, भंडारा येथे 10 आणि चंद्रपूरमध्ये 95 अशा एकूण 341 वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरणची कार्यालये आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.

केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या आधारे राज्यात कृषी ग्राहक वगळता सर्व ग्राहकांच्या कार्यालय अथवा निवासस्थानी विजेचे स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता प्रत्यक्ष मीटर बसविण्यात येत आहेत. वीज ग्राहकांना महावितरणकडून स्मार्ट मीटर मोफत मिळणार आहेत. तसेच संबंधित कंपन्यांवर या मीटरची दहा वर्षे देखभाल दुरुस्ती करण्याचे बंधन आहे.

महावितरणच्या वीज ग्राहकांना देण्यात येणारे स्मार्ट मीटर हे आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित आहेत. त्यामुळे वापरलेल्या विजेची अचूक नोंद होईल तसेच वीज ग्राहकांना त्यांच्या मोबाईल फोनवर नियमितपणे आपला वीजवापर समजेल. सध्या सर्वत्र वापरात असलेल्या पारंपरिक मीटरच्या बाबतीत चुकीचे रिडिंग होणे, वेळेवर रिडिंग झालेले नसणे, चुकीची बिले येणे, अशा काही समस्या जाणवतात. मोठा वीजवापर झाल्यानंतर बिल मिळाले की अचानक ग्राहकाला आपल्या वीजवापराबद्दल समजते आणि धक्का बसतो. अत्यंत पारदर्शी पद्धतीने अचूक बिलिंग हे स्मार्ट मीटरचे वैशिष्ट्य आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांच्या बिलाविषयीच्या तक्रारींचे संपूर्ण निराकरण होईल. असे मीटर वापरणे काळाची गरज झाली आहे.

देशामध्ये मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यात स्मार्ट मीटरचा वापर काही प्रमाणात सुरू झाला आहे व तेथील ग्राहक अचूक बिलिंग आणि वीजवापराची नियमित माहिती मिळणे या सुविधेचा वापर करत आहेत.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कृती आराखडा सज्ज ठेवा - विजयलक्ष्मी बिदरी

Sat Jun 1 , 2024
Ø मान्सूनपूर्व तयारीचा आढावा Ø विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज Ø संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवा Ø आंतरराज्य सिंचन प्रकल्पासंदर्भात समन्वय Ø जिल्हा व तालुका स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित  नागपूर :- हवामान खात्याने विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही तसेच बाधित होणाऱ्या गावांसाठी विशेष कृती आराखडा तयार करुन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com