नागपूर, ता. २१ : केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ‘ओपन डेटा आठवडा’ साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने स्मार्ट सिटीच्या ई-गव्हर्नन्स विभागामार्फत ऑनलाईन चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. चर्चेत सोल्युशन डेटा आर्किटेक्ट कंपनीचे हिरेन पाठक, सायबर सेक प्रा. ली. चे संचालक उमेश पटेल, विप्रो टेक्नॉलॉजिस कंपनीचे टेस्ट लीड कल्पेश परमार सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थित सर्व प्रमुख तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. चर्चेची सुरुवात करताना हिरेन पाठक म्हणाले, शासकीय डेटाचा निष्कर्ष काढून ते नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासकीय डेटाचा उपयोग नागरिकांच्या फायद्यासाठी होऊ शकतो, असेही ते म्हणाले. उमेश पटेल म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात डेटा निघत आहे. यामधील काही डेटा नागरिकांना देण्याची आवश्यकता आहे. डेटाच्या माध्यमातून नागरिकांची होणारी फसवणूक थांबविता येईल. कल्पेश परमार म्हणाले, शासकीय माहितीचा उपयोग लोकाभिमुख योजनांसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे त्या डेटाला बारकाईने तपासून नागरिकांपर्यंत पाठविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी ई गव्हर्नन्स विभागाचे महाव्यवस्थापक डॉ. शील घुले यांनी आपल्या प्रास्ताविकात ‘ओपन डेटा आठवडा’ याबद्दल माहिती सांगितली. तसेच त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून आभार मानले.
याप्रसंगी मुख्य वित्त अधिकारी नेहा झा, मुख्य नियोजक राहुल पांडे, विधी अधिकारी मनजीत नेवारे, सोनाली गेडाम, अनुप कुमार लाहोटी, कुणाल गजभिये, आरती चौधरी आदी उपस्थित होते.