कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते महारोजगार मेळाव्याचा शुभारंभ

मुंबई : मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांमार्फत आज मुलुंड आणि ठाणे येथे झालेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यास नोकरीइच्छुक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान, चिंतामणी चौक, जांभळी नाका, ठाणे येथे आयोजित मेळाव्यात पाचवी पास उमेदवारापासून बीई, एमबीए अशा विविध पदवीप्राप्त उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली. विविध कंपन्यांनी एकूण 4 हजार 152 पदांसाठी आज मुलाखती घेतल्या. यावेळी 398 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली तसेच 47 जणांची अंतिम निवड झाली.

शासकीय आयटीआय, मुलुंड येथे झालेल्या महारोजगार मेळाव्यात 9 हजार 063 इतक्या जागा विविध कंपन्यांनी मुलाखतीसाठी उपलब्ध करून दिल्या. या मेळाव्यात 813 नोकरीइच्छुक उमेदवारांनी सहभाग घेतला. त्यापैकी 306 उमेदवारांची प्राथमिक तर 22 उमेदवारांची अंतिम निवड विविध कंपन्यांमार्फत करण्यात आली.

5 लाख रोजगार देण्याचे उद्दीष्ट – मंत्री मंगलप्रभात लोढा

मंत्री मंगलप्रभात लोढा यावेळी म्हणाले की, कौशल्य विकास विभागाने तरुणांना कौशल्य विकासाबरोबरच रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत. राज्य शासनाने 75 हजार सरकारी नोकऱ्या देण्याचा निर्धार केला आहे, त्याचबरोबर कौशल्य विकास विभागाद्वारे विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र यांच्याशी समन्वय साधून येत्या काळात 5 लाख रोजगार देण्यात येतील. युवक-युवतींना त्यांच्या आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण आणि त्यानंतर खात्रीची नोकरी देण्यासाठी कौशल्य विकास विभाग विविध उपक्रम प्रभावीपणे राबवेल. राज्यभरात सर्व जिल्ह्यांमध्ये 300 रोजगार मेळावे घेण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

या मेळाव्यास विद्यार्थी आणि नोकरीइच्छूक उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विविध कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट यांनी विद्यार्थ्यांच्या थेट मुलाखती घेतल्या. ठाणे येथील मेळाव्यासाठी आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील, मेळाव्याचे समन्वयक प्रदीप दुर्गे, कौशल्य विकास सहायक आयुक्त संध्या साळुंखे, ठाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य स्मिता माने, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह विविध कंपन्या, आर्थिक विकास महामंडळे यांचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते. मुलुंड येथील मेळाव्यासाठी खासदार मनोज कोटक, आमदार मिहिर कोटेचा यांच्यासह स्थानिक प्रतिनिधी, विविध कंपन्या, शासकीय महामंडळे यांचे प्रतिनिधी आणि नोकरीइच्छुक उमेदवार उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र वर्धा रोडवर हलविण्याचे सरकारचे षडयंत्र

Sun Mar 5 , 2023
नागपूर :- इंदोरा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात नवीन पदव्युतर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम तसेच ६१५ खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. सत्तांतरानंतर शिंदे – फडणवीस सरकार आता वर्धा रोडवर हे रुग्णालय बांधण्याचा विचार करत आहे. उत्तर नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्राला ११६५ कोटींचा निधी मंजूर असतानाही न्यायालयाच्या स्थगितीमुळे त्याचे काम सुरू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!