– ५० आदिवासी युवकांची तुकडी आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी बंगळुरू ला रवाना
– नेहरू युवा केंद्राचा उपक्रम कार्यक्रम
गडचिरोली :- “गडचिरोली जिल्ह्याला नैसर्गिक व सांस्कृतिक संपन्नतेचा वारसा लाभला आहे. प्रदुषणमुक्त, आदिवासी संस्कृति जतन करणारा, शुद्ध हवा, शुद्ध पाणी असलेला, सर्वाधिक जास्त खनिजांचा जिल्हा व महाराष्ट्राचे फुफ्फुस म्हणून ओळखला जाणारा जिल्हा अशी सकारात्मक ओळख आपण अभिमानान जगासमोर मांडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज केले.
नेहरू युवा केन्द्र युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय भारत सरकार व केंद्रीय रिजर्व पोलिस दल यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील ५० आदिवासी युवकांची तुकडी आज बंगळुरू(बँगलोर) येथे १ ते ७ डिसेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रमासाठी रवाना करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित प्रस्थान कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी संजय दैने युवकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय रिजर्व पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा उपस्थित होते.
पोलिस उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा यांनी यावेळी युवकांशी संवाद साधताना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाह्य जगाची माहिती मीळवावी, इतर राज्यातील आदिवासी संस्कृती, कला आणि इतर सामाजिक गोष्टीची माहिती प्राप्त करून त्यातून आपला सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्याचे सांगितले. तसेच आपण गडचिरोलीच नाही तर महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहात त्यामुळे या संधीचा लाभ घेऊन आपल्या जिल्ह्याचे नाव उंचवण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमा प्रसंगी डेप्युटी कमांडंट सुमित वर्मा, डेप्युटी कमांडंट नितीन कुमार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार आभार केंद्रीय पोलीस दलाचे पांडे यांनी मानले.
नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड आणि एटापल्ली विभागातील एकूण 50 उमेदवार या तुकडीत समाविष्ट आहेत. 2024-25 या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील एकूण 450 आदिवासी युवकांना पोलीस महानिरीक्षक¸ पश्चिम विभाग केंद्रीय राखीव पोलीस दल, नवी मुंबई ¸ केंद्रीय राखीव पोलीस दल गडचिरोली आणि नेहरू युवा केंद्र¸ गडचिरोली. भारतातील विविध 09 ऐतिहासिक शहरांमध्ये पाठवले जाणार आहे. केंदीय रिझर्व्ह पोलीस दल आणि नेहरू युवा केंद्र संघटना आदिवासी युवकांच्या विकासासाठी आणि त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी 2006 पासून आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करत आहे.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे आणि त्यांना विविधतेतील एकतेची संकल्पना आत्मसात करणे, त्यांना विकासात्मक उपक्रम आणि औद्योगिक प्रगतीची जाणीव करून देणे आणि आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी, मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे, पॅनल चर्चा, व्याख्यान सत्र, आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम, वक्तृत्व स्पर्धा, कौशल्य विकास, करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी, महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.