– ‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे – डॉ.भारती हेडाऊ
नागपूर :- काळमहिम्यानुसार रामराज्य येणारच आहे. जसे ‘पहाट होणे’ कुणी थांबवू शकत नाही, तसे ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राचे निर्माण’ कुणीही थांबवू शकत नाही. ‘रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची स्थापना होणार’, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. रामराज्याचे आपल्याला साक्षीदार नाही, तर साथीदार व्हायचे आहे. आपणही रामराज्यात रहाण्यासाठी साधना करत धर्माचरणी बनले पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचे, तर ‘साधना’ हा रामराज्यात प्रवेश मिळवण्यासाठीचा ‘परवाना’ (लायसन्स) आहे. सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. आपल्याला ईश्वरप्राप्ती करायची ओढ असो वा नसो, एक चांगले समाधानी जीवन जगता येण्यासाठीही साधना करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने साधना करण्याचा आणि ती वाढवण्याचा संकल्प करूया.” असे प्रतिपादन डॉ .भारती हेडाऊ यांनी ‘आनंदप्राप्ती अन् रामराज्याची स्थापना यांसाठी साधना’ या विषयांवर मार्गदर्शन करतांना केले. सनातन संस्थेच्या वतीने नागपूर येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात त्या बोलत होत्या. सनातन संस्थेच्या वतीने नागपूर जिल्ह्यात स्व. श्रीमंत राजे तेजसिंहराव भोसले सभागृह तुळशीबाग, महाल येथे, तसेच देशभरात एकूण ७५ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
गुरुपौर्णिमा महोत्सवात मार्गदर्शन करताना ब्राह्मण महासभा, नागपूर चे अध्यक्ष रामनारायण मिश्रा म्हणाले की, ‘ आपण जीवनात व्यावहारिक दृष्ट्या कितीही यशस्वी झालो तरीही आत्मिक समाधान आणि सकारात्मक परिवर्तन केवळ गुरुकृपेने होऊ शकते. याची अनुभूती सनातन संस्थेशी जोडल्यावर आणि सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांना भेटल्यावर मला आली. सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. जयंत आठवले यांनी सांगितले आहे त्यानुसार हिंदुराष्ट्र येणारच हे निश्चित आहे, आपल्या जीवनाचे सार्थक करण्यासाठी आपण त्यात सहभागी होणे आवश्यक आहे.’
महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या गुरुपौर्णिमा महोत्सवांत विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने जिज्ञासू उपस्थित होते. या महोत्सवांत धर्म, अध्यात्म, साधना, बालसंस्कार, आचारधर्म, आयुर्वेद, प्रथमोपचार, स्वसंरक्षण, हिंदु राष्ट्र आदी विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात आले. काही साधकांनी साधना सुरू केल्यावर जीवनात झालेले आमूलाग्र बदल आणि कठीण प्रसंगात धैर्याने समोर जाण्यासाठी मिळालेले आध्यत्मिक बळ या विषयी स्वतःचे अनुभव सांगितले.
६ भाषांमध्ये ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव : देश-विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजरात, तमिळ, मल्याळम् या ६ भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवही संपन्न झाले. या माध्यमांतून देश-विदेशांतील भाविकांनी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवां’चा लाभ घेतला.