– कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या सभागृहाचे उद्घाटन
नागपूर :- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातील स्व. डॉ. कमलाकर तोतडे सभागृह रामटेकमधील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठी वापरले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच हे सभागृह रामटेकच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणारे ठरेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) येथे व्यक्त केला.
रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर भवनाचे तसेच स्व. डॉ. कमलाकर तोतडे सांस्कृतिक सभागृहाचे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, पुष्पा तोतडे, अरविंद तोतडे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी, माजी कुलगुरू प्रा. उमा वैद्य, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी, कुलसचिव प्रा. कृष्णकुमार पांडेय, माजी कुलगुरू प्रा. मधुसुदन पेन्ना यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. यासोबतच अशोक तोतडे, किशोर तोतडे, विवेक तोतडे, विकास तोतडे यांच्यासह तोतडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
यावेळी स्व. डॉ. कमलाकर तोतडे यांच्या स्मृतींवर आधारित ‘कमलांजली’ या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. ना. नितीन गडकरी म्हणाले, ‘डॉ. कमलाकर तोतडे यांचे रामटेकशी ऋणानुबंध होते. त्यांचे वडीलही दानशूर होते. त्यामुळे पंचक्रोशीत तोतडे कुटुंबाचा लौकिक होता. डॉक्टरांनी सरकारी सेवा सोडून जनतेची सेवा केली. सेवा आणि उपचाराला प्राधान्य दिले. प्रसंगी अनेक रुग्णांकडून पैसेही घेतले नाहीत. त्यांना लोकांनीच ‘देवदूत’ उपाधी दिली होती. त्यांच्या नावाने हे सभागृह व्हावे, अशी माझी इच्छा होती. मी स्वतः या सभागृहाच्या कामात विशेष लक्ष दिले. या सभागृहाचा फायदा येथील होतकरू कलावंतांना होईल, याचा मला विश्वास आहे.’ संस्कृत विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक, स्व. डॉ. श्रीकांत जिचकार, स्व. मधुकरराव किंमतकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री मनोहरराव जोशी यांचे विशेष योगदान होते, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रमाला आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांची श्रोत्यांमध्ये उपस्थिती होती. स्व. डॉ. कमलाकर तोतडे यांचा सहवास लाभलेले वसंत रायपूरकर, वासुदेव डडोरे, रामचंद्र देवतारे, डॉ. कमलाकर लेंडे, केशव चित्रीव, डॉ. कुरेशी, डॉ. मालानी, हरीभाऊ येवतकर यांचा सत्कार करण्यात आला. स्व. डॉ. कमलाकर तोतडे यांचे तैलचित्र साकारणारे चित्रकार किशोर इंगळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. पराग जोशी यांनी सूत्रसंचान केले.
‘रामटेकचा इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहोचावा’
रामटेकचा इतिहास लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रभूश्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. कालिदासांचा सहवास या परिसराला लाभला आहे. भविष्यात हा इतिहास नवीन पिढीपर्यंत आधुनिक माध्यमातून पोहोचेल, असा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ना. नितीन गडकरी म्हणाले. रामटेकच्या गडासाठी रोप-वे मंजूर झाला असून लवकरच त्याचे भूमिपूजन होणार असल्याचेही ना. गडकरी म्हणाले.
नानांनी कुटुंब संघटित ठेवले – कांचन गडकरी
स्व. डॉ. कमलाकर तोतडे म्हणजे माझे वडील रामटेकमध्ये डॉक्टर साहेब म्हणून प्रसिद्ध होते. आम्ही त्यांना घरी नाना म्हणून संबोधायचो. आम्ही आज जे काही आहोत, ते नानांमुळे. त्यांनी आमचे कुटुंब संघटित ठेवले. त्यांनी समाजावर खूप प्रेम केले आणि समाजानेही त्यांना तेवढाच आदर सन्मान दिला. त्यांच्या निधनानंतर ४५ वर्षांनी एवढे सुंदर सांस्कृतिक सभागृह निर्माण झाल्याचा मला अत्यंत आनंद होत आहे, या शब्दांत सौ. कांचनताई गडकरी यांनी भावना व्यक्त केल्या. नानांच्या निधनानंतर आईने केलेल्या संघर्षाचा उल्लेख करताना त्यांना अश्रू अनावर झाले.