– कबड्डी व फुटबॉलच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्वाची संधी
नागपूर :- एचसीएलर्फे घेण्यात येणा-या राष्ट्रीय क्वॉलिफाईंग टूनॉमेंटमध्ये सहभागी होण्याकरिता मनपाच्या १७ वर्षाखालील फुटबॉल व कबड्डी चमूची निवड चाचणी मंगळवारी ११ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. स्व. रा.पै. समर्थ स्टेडियम (चिटणीस पार्क) येथे सकाळी ९ वाजता ही निवड चाचणी होणार आहे, अशी माहिती मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी दिली.
येत्या २३ जुलै रोजी बंगळुरू येथे एचसीएल राष्ट्रीय क्वॉलिफाईंग टूनॉमेंटचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये मनपाचा मुले आणि मुलींचा फुटबॉल व कबड्डी संघ सहभागी होईल. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्लम सॉकर तर्फे निवड चाचणी घेण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे कबड्डी करिता मुले व मुलींच्या संघात प्रत्येकी १२ खेळाडूंची निवड केली जाईल. तर फुटबॉलकरिता १३ मुले व १६ मुलींची निवड केली जाईल. कबड्डी संघासोबत प्रशिक्षक म्हणून पिंकी धांडे आणि संघ व्यवस्थापक म्हणून मनपाच्या क्रीडा निरीक्षक उज्ज्वला चरडे यांचा तर फुटबॉल करिता शिखा कलाकोटी, विकास मेश्राम, अनस अख्तर यांचा प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक म्हणून समावेश असेल. निवड झालेला मनपा संघ एचसीएल क्वॉलिफाईंग टूनॉमेंट करिता २१ जून रोजी बंगळुरू करिता रवाना होईल, असेही डॉ. आंबुलकर यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, एचसीएल राष्ट्रीय क्वॉलिफाईंग टूनॉमेंटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या संघांना २४ ऑगस्ट रोजी नोयडा येथे होणा-या एचसीएल राष्ट्रीय स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. मनपाच्या विद्यार्थ्यांच्या निवड चाचणी करीता एचसीएलचे पीयूष वानखेडे, स्लम सॉकरचे समन्वयक पंकज महाजन सहकार्य करीत आहेत.