स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्डद्वारे केली डेंग्यु जनजागृती,
१४५ शाळांनी घेतला होता सहभाग
प्रथम बक्षीस सायकल
चंद्रपूर :- डेंग्यु प्रतिबंध मोहीमेत सक्रिय सहभाग घेऊन जनजागृती करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना बालक दिनानिमित्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहीत करण्यात आले.
चंद्रपूर महानगरपालिका मनपा राणी हिराई सभागृहात १४ नोव्हेंबर बालक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात लकी ड्रॉ द्वारे शिवम तेलंगे या विद्यार्थ्याला प्रथम बक्षीस म्हणुन सायकल देण्यात आली, युग मोगरे याला द्वितीय बक्षीस म्हणुन मोबाईल टॅब तर तृतीय बक्षीस म्हणुन ट्राली बॅग हिमांशु दुर्वे या विद्यार्थ्याला देण्यात आली. तसेच शाळास्तरावर जो लकी ड्रॉ घेण्यात आला होतो त्यात ९९ विद्यार्थ्यांना बॅग पॅक,९९ विद्यार्थ्यांना मिल्टन वॉटर बॉटल, ९९ विद्यार्थ्यांना टिफीन बॉक्स अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस म्हणुन देण्यात आले.
या मोहीमेअंतर्गत शालेय विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड दिले गेले होते. ॲक्टिव्हिटी कार्डद्वारे प्रत्येक विद्यार्थ्याने पालकांच्या मदतीने व त्यांच्या उपस्थितीत पाणी साठवलेली भांडी तपासणे, कुलर, फ्रिज, फिश पॉट, पाण्याची टाकी तपासणे, डासअळी आढळल्यास पालकांच्या मदतीने भांडे कोरडे करणे व कापडाने पुसुन घेणे इत्यादी कार्यांद्वारे डासोत्पत्ती स्थाने नष्ट केली व मनपा उपक्रमाला सहकार्य केले.
खाजगी व मनपा शाळा मिळून एकूण १४५ शाळांनी यात भाग घेतला होता, ३० सप्टेंबर रोजी मोहीम संपल्यावर शाळास्तरावर लकी ड्रॉ घेण्यात येऊन विजेत्यांची माहीती आरोग्य विभागाकडे जमा करण्यात आली. या विजेत्यांमधुन अंतिम विजेते आज झालेल्या लकी ड्रॉ द्वारे घोषित करण्यात आले.
याप्रसंगी सहायक आयुक्त विद्या पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. नयन उत्तरवार, डॉ. अश्विनी भारत डॉ.जयश्री वाडे, डॉ. अतुल चटकी, डॉ.नरेंद्र जनबंधू, विविध शाळांचे शिक्षकगण, पालकगण व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
डेंग्यु व इतर कीटकजन्य रोगांचा प्रसार रोखण्यास चंद्रपूर महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली होती. कंटेनर सर्वे,गप्पी मासे निःशुल्क उपलब्ध करून देणे, संभाव्य दुषित घरांवर विशेष लक्ष, शाळांमध्ये स्टुडन्ट ॲक्टिव्हिटी कार्ड या मोहीमांद्वारे डेंग्युस प्रतिबंध घालण्यात यश आले. मागील वर्षी जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत आढळलेल्या २६५ डेंग्यु रुग्णांच्या तुलनेत यंदा केवळ १ सक्रिय रुग्ण मनपा कार्यक्षेत्रात आहेत.