चंद्रपूर :- केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून अमृत २.० योजनेअंतर्गत “जल दिवाळी’ उपक्रम साजरा करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार डेएनयुएलएम व अमृत २.० च्या कृतिसंगमातुन “ पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान ” च्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला.
७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने ‘जल दिवाळी’ असा उपक्रम आयोजित केला ज्यात बचतगटांच्या महिलांसाठी तुकूम जलशुद्धीकरण केंद्र येथे भेट घडवुन आणण्यात आली. याप्रसंगी ईरई धरणातून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कसे येते, त्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध कसे केले जाते. पाणी वाटपाची यंत्रणा कशी काम करते, या केंद्राची पाणी शुद्ध करण्याची क्षमता किती आहे याबाबतची माहीती शहरातील बचत गटाच्या महिलांना दिली गेली. जलकेंद्रांला भेट देणाऱ्या या महिलांना स्मृतीचिन्ह व भेट वस्तू देऊन या उपक्रमाच्या स्मृती जपल्या गेल्या.
शहराची वेळोवेळी झालेली हद्दवाढ व वाढती लोकसंख्या त्यामुळे शहराच्या सर्व भागात शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे आव्हान महापालिकेपुढे असते. परंतु, ही प्रक्रिया कशी केली जाते याची माहिती सामान्य नागरिकांना नसते.त्यामुळे सदर उपक्रम राबविण्यात आला तसेच शुद्ध व निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याची प्रक्रियेबाबत महिलांना शिक्षित करणे, स्वच्छ पाणी पुरवठ्याच्या प्रक्रियेची माहिती देणे, पाणी पुरवठ्याच्या सुविधेबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची जाणीव वाढविणे व पाणी पुरवठा विभागाच्या आगामी योजनांमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न हा “जल दिवाळी’ उपक्रमाचा उद्देश होता.