– सर्व पत्रकारांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा जनसंपर्क विभाग, जिल्हा मराठी पत्रकार संघ, अमरावती व श्रमिक पत्रकार संघ, अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील डॉ.के.जी. देशमुख सभागृहामध्ये दि. 19 ऑगस्ट, 2023 रोजी ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर पत्रकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेचे स्वरुप
दि. 19 ऑगस्ट, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता उद्घाटकीय प्रथम सत्राचे आयोजन करण्यात येणार असून प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार तथा स्तंभलेखक तसेच आय.बी.एन. लोकमत व झी – 24 तासचे माजी संपादक डॉ. उदय निरगुडकर हे ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर बीजभाषण करतील. प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले भूषविणार असून प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभणार आहे.
दुपारी 12.00 वाजता द्वितीय सत्राचे आयोजन करण्यात आले असून ‘सोशल मिडीया व प्रसार माध्यमे’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून दैनिक लोकमत, मुंबईचे सहयोगी संपादक यदू जोशी हे मार्गदर्शन करतील. सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भैयासाहेब मेटकर भूषवतील.
दुपारी 1.00 वाजता तिसया सत्राचे आयोजन करण्यात आले असून सत्राचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगांवकर भूषवतील. ‘ग्रामीण पत्रकारिता व भाषा संवर्धन’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य तथा यशदा, पुणेचे संचालक राजीव साबडे हे मार्गदर्शन करतील. दुपारी 2.00 वाजता डॉ. उदय निरगुडकर, यदू जोशी व राजीव साबडे हे उपस्थित पत्रकारांशी सामूहिक चर्चा करतील.
19 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजतापासून नोंदणी
विद्यापीठाच्यावतीने आयोजित पत्रकार कार्यशाळेमध्ये सर्व संपादक, जिल्हा प्रतिनिधी, प्रतिनिधी, सर्व पत्रकार व पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थी यांना सहभागी व्हावयाचे असून नोंदणी सकाळी 9.30 वाजतापासून सुरु होणार आहे. याप्रसंगी सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
तरी सर्व संबंधितांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, जिल्हा मराठी पत्रकार संघ, अमरावतीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल व श्रमिक पत्रकार संघ, अमरावतीचे अध्यक्ष गोपाल हरणे यांनी केले आहे.