दारव्हा :- दिग्रस मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांनी आज दारव्हा येथील उमा शंकरराव कणीकर माध्यमिक कन्या शाळेत सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या सहचारिणी शीतल संजय राठोड, मुलगी दामिनी आणि मुलगा सोहम उपस्थित होते.
यावेळी मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगेत उभे राहून क्रमांक आल्यानंतर राठोड परिवाराने मतदान केले. मतदानानंतर दारव्हा येथे संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला. दिग्रस मतदारसंघात सुरू असलेले विकासाचे पर्व अविरत सुरू ठेवण्यासाठी मतदारसंघातील जनतेने आवर्जून मतदान करावे, असे आवाहन केले. महायुतीचाच विजय निश्चित असून, दिग्रस, दारव्हा, नेर तालुक्याच्या विकासासाठी कायम कटिबद्ध असल्याचे यावेळी संजय राठोड म्हणाले. दिग्रस मतदारसंघ महाराष्ट्रासाठी ‘विकासाचा मॉडेल’ ठरावा, यासाठी आपण कायम प्रयत्नरत राहू, असे त्यांनी सांगितले. विकासाच्या मुद्यावर ही निवडणूक होत आहे. त्यामुळे भविष्यात राज्यात दिग्रस मतदारसंघ राज्यात अव्वल राहील असे संजय राठोड यावेळी म्हणाले. याप्रसंगी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई(आ.), पीरिपा, लहुजी सेना आदी मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.