#टाकळघाट येथे वाचनालय बांधकामाचा प्रश्न एरणीवर
#सरपंच शारदा शिंगारे यांची भूमिका संशयास्पद
#वाचनालयाचा मंजूर निधी परतीच्या मार्गावर
टाकळघाट :- वाचनसंस्कृतीचा भाषना मधून उदो उदो करणाऱ्या सरपंच शारदा शिंगारे गत पाच वर्षापासून सत्तेत असून गावात मंजूर असलेले वाचनालय अजून पर्यंत बांधून झाले नाही हे वास्तव आहे.गावात वाचनालय मंजूर केले व त्याचे बांधकाम लवकर करून देईल अशी आशा बाळगून जनतेने त्यांना पुन्हा बहुमताने दुसऱ्यांदा सरपंच पदावर विराजमान केल्यानंतरही सरपंचबाई वाचनालय बांधकामाकडे लक्ष देत नसल्याने मंजूर वाचनालयाचा निधी परतीच्या मार्गावर आहे. त्यामुळे सोनाबाई नगर येथे मंजूर असलेल्या वाचनालायचे बांधकाम न करता सरपंच शारदा शिंगारे वाचनालय बासणात गुंडाळणार हे मात्र सत्य आहे.
“वाचाल तर वाचाल” या उक्तीने प्रेरित होऊन तसेच वाचनालय हे मानवची बौद्धिक पातळी वाढवीत असून, वाचनाने विचार समृद्ध होतात म्हणून गावात वाचनालय असणे गरजेचे समजून येथील युवकांनी शुभम झापे यांच्या नेतृत्वात दि १३ जून २०२२ ला टाकळघाट येथे वाचनालयाची मागणी करणारे निवेदन तत्कालीन व विद्यमान सरपंच शारदा शिंगारे यांना दिले होते.त्या अनुषंगाने दि २४ ऑगस्ट २०२२ रोजी ग्रामपंचायत टाकळघाट ने ग्रामसभेचे आयोजन करून सरपंच शारदा शिंगारे यांच्या अध्यक्षतेत टाकळघाट, सोनाबाई नगर येथे वाचनालय बांधकामास जागा उपलब्ध असून, वाचनालय बांधकाम करण्यास नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेता आतिष उमरे यांच्या कडे निधी मंजुरी करिता प्रस्ताव पाठविण्याचे सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला.त्यानंतर दि ३० ऑगस्ट २०२२ ला ग्रामविकास अधिकारी जीवन देशमुख यांनी सरपंच शारदा शिंगारे यांच्या स्वाक्षरीणीशी नागपूर जिल्हा परिषद विरोधी पक्षनेता आतिष उमरे यांना निधी मंजुर करून देण्याकरिता पत्र दिले.
टाकळघाट हे गाव जवळपास २५ हजार लोकसंख्येचे असून गावात जवळपास २ हजाराच्या घरात विध्यार्थी शिक्षण घेतात. अनेक विध्यार्थी उच्चं शिक्षण तसेच स्पर्धा परीक्षेची तयारीही करीत आहे. यामुळे गावात वाचनालायची गरज असून, गावातील युवकांची मागणी बघता ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही चळवळ वाढविण्याकरिता नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता आतिष उमरे यांनी आमदार समीर मेघे यांच्या कडे वाचनालय बांधकामा करिता निधी उपलब्ध करून देण्याकरिता सतत पाठपुरावा केला. त्यानुसार आमदार समीर मेघे यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतर्गत ग्रामपंचायत टाकळघाट अंतर्गत सोनाबाई नगर येथे वाचनालयाची इमारत बांधकामा करिता १५ लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. निधी मंजूर झाल्यानंतर दि १४ ऑगस्ट २०२३ ला ग्रामपंचायत नें करून दिलेल्या करारनाम्यानुसार उपरोक्त वाचनालायचे काम दिलेल्या जागेवर सहा महिन्याचे आत करण्याचे आदेश हिंगणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांचे पत्र ग्रामपंचायत टाकळघाट ला मिळाले.
विशेष बाब अशी कि, वाचनालायचा बांधकाम निधी मंजूर होऊन व बांधकामाचे आदेश मिळून आजघडीला जवळपास सात महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी ग्रामपंचायत व सरपंच शारदा शिंगारे यांनी वाचनालायचे काम सुरु केले नाही. यावरून सरपंच शारदा शिंगारे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत असून जर हे काम लवकरात लवकर सुरु केले नाही तर वाचनालायचा मंजूर निधी परत जाईल हे मात्र अटल आहे.तरी गावातील विद्यार्थी व युवकांच्या भविष्याचा विचार करून वाचनालायचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.