नागपूर :- नागपूर शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या पूलांवर लोखंडी जाळी लावण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नागपूर महानगरपालिकेद्वारे घेण्यात आलेला आहे. पुलावरून कुणीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना म्हणून दहाही झोनअंतर्गत नाल्यांच्या पूलांवर दोन्ही बाजूला ही जाळी लावण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी ता. (27) येथील प्रभाग 17 मध्ये रेल्वे अंडर ब्रिज विजय टॉकीज जवळ येथील नाल्यावर लावलेली जाळी याचे निरीक्षण केले. त्यांनी जाळी वर ‘जन जागृती संदेश’ लावण्याचे निर्देश दिले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार शहरातील दहाही झोनमधून नाल्यांवरील 59 ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत. या पूलांवर जाळी लावण्याचे काम सुरू आहे.
पूलांवरून मोठ्या प्रमाणात कचरा नाल्यांमध्ये टाकला जातो. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होतो. या समस्येवर उपाययोजना म्हणून मनपाद्वारे दहाही झोनमधील नाल्यांच्या 59 पुलांवर दोन्ही बाजूला मजबूत लोखंडी कठडे आणि त्यावर जाळी लावण्यात येत आहे.काही झोन मध्ये काम पुर्ण झाला आहे तर काही ठिकाणी सुरू आहे.
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत खामला चौक सहकार नगर घाट यासह एकूण ५ ठिकाणी सुरक्षा जाळी लावली जात आहे. याशिवाय धरमपेठ झोनमधील अंबाझरी ओव्हर फ्लो, यशवंत स्टेडियम नाग नदी, भोले पेट्रोल पम्प जवळील नाला यासह एकूण ११ ठिकाणी, हनुमान नगर झोनमधील मानेवाडा घाट बेसा रोड यासह एकूण ५ ठिकाणी, धंतोली झोनमधील नरेंद्र नगर चौक, सरदार पटेल चौक घाट रोड यासह एकूण ७ ठिकाणी, नेहरू नगर झोनमधील जगनाडे चौक नाला यासह एकूण 5 ठिकाणी, गांधीबाग झोनमधील गंगाबाई घाट पुलासह एकूण ५ ठिकाणी, सतरंजीपुरा झोनमधील शांतीनगर नाला जैन मंदिर जवळ यासह एकूण ५ ठिकाणी, लकडगंज झोनमधील कृषी विद्यापीठासह एकूण ५ ठिकाणी, आशीनगर झोनमधील अशोक चौक नाला यासह ६ ठिकाणी आणि मंगळवारी झोनमधील पोलिस तलाव चौक यासह ५ ठिकाणी सुरक्षा जाळी लावण्यात येत आहे.अतिवृष्टीच्या काळात नदी, नाल्याचा प्रवाह सुरक्षित सुरू राहण्याकरीता ही उपाय योजना करण्यात येत आहे. मनपा आयुक्तांच्या पाहणीच्या वेळी कार्यकारी अभियंता ( प्रकल्प ) अल्पना पाटणे, कनिष्ठ अभियंता देवचंद काकडे, स्थापत्य अभियांत्रिक सहायक कंठावार उपस्थित होते.