मतदार यादी नाव नोंदणी मोहिमेत बेघरांनी नोंदवला सहभाग !

बेघरांना मिळाला मतदानाचा अधिकार..

नागपूर,ता. १६ : नागपुर शहराच्या फुटपाथवरील बेघर, निराधारांना निवा-याची चांगली सोय उपलब्ध होवून, त्यांचं जगणं सुसह्य व्हावं, यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानातंर्गत नागपुर महानगरपालिका, समाज विकास विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री दीपक मीना तसेच उपायुक्त श्री रविंद्र भेलावे, समाजकल्याण अधिकारी श्री दिनेश उमरेडकर यांच्या मार्गदर्शनात व्यवस्थापक श्री प्रमोद खोब्रागडे, श्री विनय त्रिकोलवार, नूतन मोरे यांच्या सहकार्याने नागपूर शहराच्या फुटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य अविरत सुरू आहे.

सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी असून या लोकशाहीच्या उत्सवात बेघरांचा सहभाग व्हावा यासाठी आधार शहरी बेघर निवारा, सीताबर्डी नागपुर येथे बेघर नागरिकांसाठी मतदार यादी नाव नोंदणीसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामुळे मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या बेघर नागरिकांना मतदार यादीत नोंदणी करता आली. मतदानाचा अधिकार मिळाल्याने यावेळी बेघरांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. त्यांच्या चेहर्‍यावरील व्दिगुणीत झालेले हास्य, आनंद पाहून उपस्थित सर्वांना सुखद समाधान मिळाले.

याप्रसंगी मतदान नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती हेमा बडे, नायब तहसीलदार श्रीमती माया पाटील, दीपक पसारकर, महेश येडे, राजेश कुंदारपवार तसेच निवारागृहाचे बेघर नागरिकांसह कर्मचारीवृंद उपस्थित होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!